शेवगावमधील मुख्य चौक गुदमरले; सामान्य नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास

सचिन सातपुते
Sunday, 20 September 2020

मुख्य चौक अतिक्रमण आणि फेरीवाल्याच्या विळख्यात सापडले असून त्यामुळे नागरीकांना त्यातून वाट काढणे अधिक जिकीरीचे होत चालले आहे.

शेवगाव (अहमदनगर) : शहरातील मुख्य चौक अतिक्रमण आणि फेरीवाल्याच्या विळख्यात सापडले असून त्यामुळे नागरीकांना त्यातून वाट काढणे अधिक जिकीरीचे होत चालले आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक अशा विविध कारणाने अरुंद होत असतांना नगरपालिकेचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. त्याचा त्रास मात्र सामान्य नागरीकांना सहन करण्याची वेळ आली आहे. 

शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्ता, मोची गल्ली, जैन गल्ली, जुना वरुर रस्ता, ब्राम्हण गल्ली या अंतर्गत रस्त्यांसह नगर, नेवासा, पैठण, पाथर्डी, आखेगाव, पांढरीपूल हे रस्ते दुकानदारांच्या अतिक्रमणांनी अधिच अरुंद झाले आहेत. त्यात त्यासमोर असलेल्या विविध वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीला कायम अडथळा निर्माण होतो. त्यातच क्राती चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, गाडगेबाबा चौक, मुंढे चौक, भगतसिंग चौक हे प्रमुख चौक चारही बाजूंनी दुकानाच्या पाय-या, ओटे, काऊंटर व इतर साहित्य लावल्याने अरुंद झाले आहेत.

त्यातच हातगाडीवरील फळ, भाजीपाला, पानफुल, खेळणी व पाणीपुरी, भेळ, वडापाव, खारी, पानमसाला, गुटखा, मावा आदी विक्रेत्यांनी दुकनांसमोर गाडया लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अरुंद झालेले रस्ते दोन्ही बाजूंनी या विक्रेत्यांनी गिळंकृत करुन टाकली आहेत. त्यातच बाजार पेठेत येणा-या ग्राहकांच्या दुचाकी वाहनांची पार्कींग व्यवस्था नसल्याने त्याही तेथेच रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या असतात. 

त्यामुळे या रस्त्यावरुन शहरातील नागरीकांना ये जा करतांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होवू नये म्हणून गर्दी टाळण्यास प्रशासन वारंवार सांगत असले तरी शहरातील मुख्य रस्त्यात व चौकात होणारी वाहतुक कोंडी कशी टाळावी याबाबत काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे दुचाकी व पायी जाणा-या नागरीकांना गर्दीत अडकुन पडण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे संसर्गाची भिती आणखी वाढते आहे. हातगाडीवरील विक्रेत्यांना पर्याय उपलब्ध करुन दिले जात नाहीत.

मागे जागा सोडून धंदयाच्या अमिशापोटी रस्त्याच्या व चौकाच्या निम्या जागेमध्ये ते अतिक्रमण करतात. त्यामुळे नगरपरीषद व शहर वाहतुक पोलीसांनी याकडे लक्ष देवून अशा व्यावसायिकांना समज देण्याची व त्यांना वाहतुकीस अडथळा ठरणार नाही अशी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी सर्वसामान्य नागरीकांमधून होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment on the main chowk in Shevgaon