पराभूत उमेदवारांनाही गावाच्या विकासात सामावून घेणार

सनी सोनावळे 
Friday, 22 January 2021

डेरे म्हणाले, आमदार निलेश लंके यांनीही गावाच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. गावातील जेष्ठांना व तरूणांना बरोबर गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे डेरे यांनी सांगितले.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : गावातील एकोपा टिकून राहावा, याकरीता आधी बिनविरोधसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र लोकशाही बळकटीसाठी निवडणूक आवश्यक असल्याचे गावातील काही सहकार्यांचे म्हणणे आले. आता निवडणूक पार पडली पराभूत उमेदवारांनाही गावाच्या विकासात सामावून घेणार व गावाचा एकोपा टिकवून ठेवणार असल्याचे प्रतिपादन उद्योजक किरण डेरे यांनी केले.

पाडळी आळे (ता.पारनेर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार निलेश लंके व माजी जिल्हा परीषद सदस्य मधुकर उचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख उद्योजक किरण डेरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुकृपा पॅनलने आठ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र ननिवडून आलेले व पराभुत झालेले उमेदवार हे आपलेच लोक आहेत. आता निवडणूक संपली आता आपण सर्व एक आहोत, ही भावना रहावी याकरीता पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला त्यावेळी डेरे बोलत होते. यावेळी उत्तम गावडे, अशोक डेरे, मोनिका पवार, पुजा गावडे उपस्थित होते.

डेरे म्हणाले, आमदार निलेश लंके यांनीही गावाच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. गावातील जेष्ठांना व तरूणांना बरोबर गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे डेरे यांनी सांगितले.

हा पायंडा सगळीकडे रहावा : पद्मश्री पोपटराव पवार 

निवडणूक ही क्षणिक व गावाच्या भविष्यासाठी असते. त्यात हार जित होत राहते, यात नातेसंबंध देखील असतात. विजयी उमेदवारानी निवडणुकीनंतर वादविवाद न करता सर्व गाव आपलेच या भावनेतून काम करावे व पराभूत उमेदवारानी लोकांचा कौल मान्य करून चुकल तेथे विरोध करावा आणि चांगल्या गोष्टीत सहकार्य करावे. पाडळी आळेमध्ये पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवाराचा सत्कार केला खरे तर हे लोकशाहीचे घोतक आहेत. निवडणूक संपली की सर्वांनी एकोप्याने गावाचा कारभार करावा, अशी प्रतिक्रिया पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneur Kiran Dere has said that the defeated candidates will also be included in the development of the village