पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरही तनपुरे कारखान्याच्या कामगारांचा अपेक्षाभंग

विलास कुलकर्णी
बुधवार, 6 मे 2020

शासन निर्णयानुसार आपल्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना तीन दिवसांच्या आत सर्व थकित वेतन अदा करुन, या कार्यालयास तात्काळ अहवाल पाठवावा, असा आदेश देण्यात आला. मात्र, तीन दिवसांचा कालावधी उलटूनही कारखाना व्यवस्थापनाने थकित वेतन देण्याविषयी कोणतीही हालचाल केलेली नाही.

राहुरी : डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारपूत्राने थकीत वेतनासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "पोर्टल'वरच तक्रार केली. प्रधानमंत्री मोदी यांनीही तातडीने या तक्रारीची दखल घेतली. नगरच्या सहायक कामगार आयुक्तांनी कारखाना व्यवस्थापनाला पत्र देऊन, तीन दिवसांत कामगारांचे थकीत वेतन अदा करण्याचा आदेश दिला; परंतु व्यवस्थापनाने या आदेशालाही हरताळ फासत, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे, थकित वेतन मिळण्याच्या कामगारांच्या उंचावलेल्या अपेक्षा फोल ठरल्या. 

अवश्‍य वाचा- नगरमध्ये हनीट्रॅप... 

तनपुरे साखर कारखान्याचे कामगार चंद्रकांत कराळे यांचा मुलगा निखील याने मागील आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या पोर्टलवर तक्रार दाखल केली. "वडिलांचे 50 महिन्यांचे वेतन थकले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारमारीची वेळ आली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे आहेत. थकीत वेतन अदा करण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा,' अशी मागणी निखील कराळे याने केली होती. 

कोरोनामुळे गंभीर परिस्थिती

त्यावर, पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे हलली. नगरचे सहायक कामगार आयुक्तांनी कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना पत्र पाठविले. त्यात, कराळे यांच्या तक्रारीचा उल्लेख करून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अतिगंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने 31 मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार कायम कामगार, कंत्राटी कामगार, शिकावू व इतर सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन देण्याबाबत निर्देशीत केले आहे. 

कामगारांचा भ्रमनिरास

शासन निर्णयानुसार आपल्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना तीन दिवसांच्या आत सर्व थकित वेतन अदा करुन, या कार्यालयास तात्काळ अहवाल पाठवावा, असा आदेश देण्यात आला. मात्र, तीन दिवसांचा कालावधी उलटूनही कारखाना व्यवस्थापनाने थकित वेतन देण्याविषयी कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे कामगारांचा भ्रमनिरास झाला असून, उंचावलेल्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. 

उपोषणाशिवाय पर्याय नाही

तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांची उपासमार सुरू आहे. अनेक कामगारांच्या कुटुंबांना सामाजिक संस्थांच्या अन्नछत्राचा आधार घ्यावा लागत आहे. पंतप्रधान मोदी यांचा हस्तक्षेप व कामगार आयुक्तांच्या पत्राला व्यवस्थापनाने केराची टोपली दाखविली. त्यामुळे, आता उपोषणाशिवाय पर्याय नाही. 
- सुरेश थोरात, अध्यक्ष, कामगार कृतिसमिती, राहुरी फॅक्‍टरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after the intervention of Prime Minister the workers of Tanpure factory were disappointed