विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही तरी त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार

दौलत झावरे
Sunday, 22 November 2020

सोमवारी (ता. 23) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक परिस्थितीचा विचार केला जाणार आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी (ता. 23) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक परिस्थितीचा विचार केला जाणार आहे. गंभीर परिस्थिती असलेल्या ठिकाणी नंतर शाळा सुरू केल्या तरी चालतील. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही तरी त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे,  असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. 

डिझेलप्रकरणी आरोप बिनबुडाचे 
बनावट डिझेल प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. विरोधकांकडे बोलायला मुद्दे नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. मात्र, कोण काय बोलतंय, हे पाहायला माझ्याकडे वेळ नाही, असे स्पष्टीकरण नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. 

राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, बनावट डिझेल प्रकरणात माझ्यावर विरोधकांनी आरोप केल्याचे समजले; मात्र ज्याच्याशी माझा काहीच संबंध नाही, त्यावर मी बोलत नाही. डिझेलप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास सुरू आहे. दोषींना न्यायालय शिक्षाही करील. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याने, मी त्याकडे लक्षही देत नाही. माझे पूर्ण लक्ष विकासकामांकडे आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचा कोणी कार्यकर्ता असला, तरी चुकीचे काम करणाऱ्यांना "राष्ट्रवादी' कधीच पाठीशी घालत नाही. प्रत्येक जण पक्षाचे काम करतो. बाकी जीवनात ते काय करतात, हे पाहणे आम्हाला शक्‍य नाही.'' 

कृषिपंप वीजबिलात 50 टक्के सवलत 
मंत्री तनपुरे म्हणाले, ""कृषिपंपांच्या थकीत वीजबिलात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. मागील पाच वर्षांतील थकबाकीदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. नवीन कृषिपंप वीजजोडणीचे धोरण घेतले आहे. त्यानुसार, राज्यभर सुमारे एक लाख कृषिपंप वीजजोडण्या दर वर्षी दिल्या जाणार आहेत.

शेतकऱ्यांना तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी, दिवसा आठ तास वीज देण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत दर वर्षी एक लाख सौर कृषिपंप देणार आहोत. वीजबिलाची 60 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यात कृषिपंपांच्या बिलाची 40 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यासाठीही सवलत देण्याचा आराखडा तयार केला आहे.'' 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even if students are not sent to school their online learning will continue