राज्यात महिलांवर अत्याचार वाढले : कोल्हे 

मनोज जोशी
Monday, 4 January 2021

महाआघाडी सरकारच्या काळात आरोपींना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने राज्यत मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या विकृतीने कळस गाठला असून आरोपी मोकाट फिरत आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टातील केसेस प्राधान्याने मार्गी लावून लेकींना न्याय दिल्यास या प्रवृत्तींना आळा बसेल.

कोपरगाव : महाआघाडी सरकारच्या काळात आरोपींना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने राज्यत मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या विकृतीने कळस गाठला असून आरोपी मोकाट फिरत आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टातील केसेस प्राधान्याने मार्गी लावून लेकींना न्याय दिल्यास या प्रवृत्तींना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली. 

पेण येथील आदिवासी समाजातील अडीच वर्षाच्या बालिकेची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. त्या घटनेचा जाहीर निषेध करीत त्यांनी भावना व्यक्त केल्या. 
कोल्हे म्हणाल्या, देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना महिला कुठेही सुरक्षित राहिली नाही. गाव आणि जिल्हा पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मेळावे आणि शिबिर आयोजित करून जनजागृती केली जात असली तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. महिलांवरील अत्याचार, शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची छेडछाड करून विनयभंग करणे, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, असे अशा घटनामध्ये गेल्या काही दिवसात वाढ होताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exploitation on women have increased in the state