ब्रेकिंग! दूधला दर नसल्याने नगर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

विलास कुलकर्णी
Wednesday, 22 July 2020

राहुरी तालुक्यातील दरडगाव तर्फे बेलापूर येथील पोलिस पाटील रेवन्नाथ मुरलीधर काळे (वय ५५) यांनी बुधवारी (ता. २२) पहाटे राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी तालुक्यातील दरडगाव तर्फे बेलापूर येथील पोलिस पाटील रेवन्नाथ मुरलीधर काळे (वय ५५) यांनी बुधवारी (ता. २२) पहाटे राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दुधाला भाव नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

मृत काळे अल्पभूधारक शेतकरी आहेत. दुग्ध व्यवसाय त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. श्रीरामपूर येथे गांधी पुतळ्यासमोर दूध आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. त्यांच्यामागे दोन पत्नी दोन मुलगे, तीन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे.

गणेश व योगेश काळे यांचे ते वडील होत. मृत काळे यांचे बंधू अरुण काळे व त्यांचे शेजारी राजेंद्र भांड यांनी सांगितले, मृत काळे यांच्याकडे २० गाई आहेत. ७०- ८० लिटर दूध डेअरीला जाते. शेती अत्यल्प असल्याने परिवाराच्या उदरनिर्वाहाचे दूध धंदा हे एकमेव साधन होते.  कोरोना लॉकडाऊनमुळे दुधाचे दर घसरले. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. गाईंना पशुखाद्य आणायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. गायांचे हाल त्यांना पाहवत नव्हते. त्यांची सहनशक्ती संपल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer commits suicide in Nagar district due to lack of milk price