पिके रोगराईच्या विळख्यात, शेतकरी हवालदिल; फवारणीसाठी धावपळ 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 January 2021

ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, पहाटेच्या वेळी पडणारे धूके, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रब्बीची विविध पिके रोगराईच्या विळख्यात सापडली आहेत.

अहमदनगर शेवगाव : ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, पहाटेच्या वेळी पडणारे धूके, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रब्बीची विविध पिके रोगराईच्या विळख्यात सापडली आहेत. तर, औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. यंदा अतिवृष्टीने खरीप पिकांना फटका बसल्यानंतर रब्बी पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली. मात्र, पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

तालुक्‍यातील सर्वच मंडलात जूनमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाची पिके वाया गेली. कपाशीचे पीकही हंगामपूर्ण होण्याअधिच काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. पावसाळा संपल्यानंतर खरिपाची पिके काढून ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, ऊस यासह रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर तालुक्‍यात पेरणी झाली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्‍यात हरभऱ्याची 5847, गहू - 5516, ज्वारी - 5887, कांदा - 2123, ऊस - 7996, मका - 799 हेक्‍टरवर पेरणी व लागवड झाली आहे. सध्या ही पिके जोमात आली असूनही ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, जमिनीतील आद्रतेमुळे तयार झालेली बुरशी, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे गव्हावर करपा, खोडकिडा, तांबेरा, हरभऱ्यावर अळ्या तर ज्वारीच्या पिकावर चिकटा, मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. 
शेतकऱ्यांची पिकावरील रोगराईमुळे फवारणीसाठी धावपळ सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are in trouble due to crop diseases in Ahmednagar