
ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने राज्यात धुमाकुळ घातला होता.
संगमनेर (अहमदनगर) : ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने राज्यात धुमाकुळ घातला होता. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतल्याने सर्व हवालदिल झाले होते. या शेतकऱ्यांना दिलासा देत तातडीने नुकसानीची पहाणी व पंचनामे करुनही अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
या वर्षी मार्च पासून कोरोनाचा राज्यात प्रादुर्भाव सुरु झाला. यामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील व्यापार, उद्योगावर परिणाम झाला. त्यामुळे उपलब्ध शेतमालही विक्री करता न आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली. अशा अवस्थेत कोरोनाशी झुंज देत शेतकऱ्यांनी प्रतिकुल परिस्थिवर मात करीत अपार कष्ट घेवून पिके उभी केली. मात्र त्यावरही निसर्गाची अवकृपा झाली.
अतीवृष्टीसह अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे शेतातील कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्षे, डाळींब या सारख्या पिकांचे आतोनात नुकसान झाले. या अकस्मात संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कृषी व महसुल विभागासह संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. संबंधित विभाग व प्रशासनाने त्यांच्या आदेशाप्रमाणे वस्तुनिष्ठ पंचनामेही केले.
शासनाने या संकटातील शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. मात्र दिवाळी होवूनही महिना उलटून गेला असला तरी, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा एक रुपयाही पदरात न पडल्याने नाराजी निर्माण झाली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर