सडू लागल्याने कांदा बाजारात.. मागणी नसल्याने बाराच्या भावात!

गौरव साळुंके
बुधवार, 8 जुलै 2020

दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकरी कांद्याच्या दरात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, यंदा कमी कालावधीत कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज झाला आहे. कमी दरात कांद्याची विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

श्रीरामपूर : कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. त्याचा परिणाम शेतमालावरही दिसत आहे. सध्या कांद्याची मागणी घटली असून, साठवलेला कांदा सडत असल्याने आवक वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली. घरगुती वापरासाठी लागणारा कांदाविक्री सुरू असली, तरी कांद्याच्या दरात अद्याप समाधानकारक सुधारणा झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकरी कांद्याच्या दरात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, यंदा कमी कालावधीत कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज झाला आहे. कमी दरात कांद्याची विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला. 

हेही वाचा : व्यापारी म्हणतात, दबाव आणल्यास लिंबूखरेदी करणार नाही.. 

आता चाळीतील कांदाही सडू लागला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकरी कांद्याची विक्री करीत आहेत. 600 ते 800 रुपये क्विंटल दरातून कांदा उत्पादनाचा खर्चही सुटत नसल्याचे कांदाउत्पादक दादासाहेब मुंडे यांनी सांगितले. 

साठवण करूनही तोटाच 

उन्हाळी कांदा काढला, त्यावेळी एक ते दीड हजार रुपये क्विंटल दर होता. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्‍यता होती. परंतु, सध्या 600 ते 800 रुपये दर मिळत आहेत. तसेच चाळीत साठवलेला कांदा यंदा 30 टक्के सडला आहे. त्यामुळे कांद्याची साठवण करुन फायदा झाला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. 

खरिपांच्या पिकांसाठी कांदाविक्री 

खरीपाची लगबग सुरू झाल्याने शेतीपूरक साहित्य खरेदी सुरू आहे. बियाणे, खते, किटकनाशके खरेदीसाठी पैशाची गरज भासत आहे. त्यामुळेही शेतकरी साठवलेला कांदा कमी दराने विक्री करीत आहेत. कांद्याची झालेली नासाडी आणि कमी दराने विक्री, यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. साठवलेल्या कांदाविक्रीतून खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. 

पुढील दोन महिने असेच दर राहणार 

कोरोनामुळे व्यापार मंदावला. कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. कांदा सडण्याच्या भीतीपोटी अनेक शेतकरी साठवलेला कांदाविक्री करतात. त्यामुळे बाजारातील कांदाआवक वाढली. दर मात्र स्थिर असून, पुढील दोन महिने असेच दर राहणार असल्याचे कांदा व्यापारी किशोर कांलगडे यांनी सांगितले.

अनेकांनी दर वाढण्याच्या आशेवर कांदा साठवला. पैशाची गरज असल्याने आता 600 ते 800 रुपयांत विक्री करतात. सध्या तालुक्‍यातून तमिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड राज्यात कांदा पाठविला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in trouble due to fall in onion prices