शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार सर्व योजनांचा लाभ

गौरव साळुंके
Friday, 25 December 2020

सदर प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांची पसंती आणि निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

श्रीरामपूर ः शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनेद्वारे विविध योजनांचा लाभ आता एकाच अर्जाद्वारे मिळणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.

सदर प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांची पसंती आणि निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वैयक्तीक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी जोडणे आवश्‍यक आहे. 

महा-डीबीटी पोर्टलसाठी https://mahadbtmahait. gov.in/ हे संकेतस्थळ असून अधिक माहितीसाठी 022-49150800 क्रमांक आहे. सदर संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल अथवा सेंतू सुविधा केंद्रासह ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्रांच्या माध्यमातून पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतो.

नोंदणीसाठी सर्व शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभार्थी म्हणून त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्रात जाऊन त्यांची आधार नोंदणी करावी लागणार आहे. सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येईल. 

अर्जदार शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना दिलेला आधार क्रमांक नोंदणीकृत आणि प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदान मिळणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, मोका तपासणीसह पूर्व संमती देणे तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बॅक खात्यावर थेट अनुदान जमा करण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन होणार आहे.

या पूर्वीच अर्जदारांनी महा-डीबीटी पोर्टलमध्ये माहिती भरली आहे. त्यांना पुन्हा माहिती भरण्याची आवश्‍यकता नाही. परंतु लाभाच्या घटकांमध्ये शेतकऱ्यांना बदल करता येणार आहे. 

 

महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर कृषिविषयक योजनेच्या लाभासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी गुरुवार (ता. 31) डिसेंबरपर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. 31 डिसेंबर अखेरपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे विभागातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करुन घ्यावे.

- संजय काचोळे, विभागीय कृषी अधिकारी,  अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will now get the benefit of all the schemes on a single application