फास्टॅगला हिवरगाव पावसामध्ये फाटा, स्थानिकांही पडतोय नाहक भुर्दंड

Fastag Update: Queues of vehicles in Hivargaon rains due to Fastag facility
Fastag Update: Queues of vehicles in Hivargaon rains due to Fastag facility

संगमनेर ः केंद्र शासनाच्या परिवहन मंत्रालयाने सोमवार ( ता. 15) व मंगळवार (ता. 16)च्या मध्यरात्रीपासून टोलनाक्यावर फास्टॅग स्टीकर बंधनकारक केले आहे. अद्यापही अशा प्रकारची सुविधा नसलेल्या वाहन धारकांची या सक्तीमुळे त्रेधा उडाली.  संगमनेर तालुका हद्दीतील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर दुप्पट टोल देताना टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी अनेकांचे खटके उडाले.
टोलनाक्यांनी वाहन कर (प्रवासी टोल) भरताना होणारी गर्दी, वाहनांच्या रांगामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या परिवहन मंत्रालयाने आरएफआयडी (रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन) तत्वावर चालणाऱ्या फास्टॅग स्टीकरची निर्मिती केली आहे.

वाहनाच्या चालकासमोरच्या काचेवर लावलेले हे स्टीकर टोलनाक्यावरुन जाताना तेथील स्कॅनरद्वारे संबंधित वाहनधारकाच्या बँक खात्यावरुन टोलची रक्कम आपोआप वर्ग होण्याची व्यवस्था या स्वयंचलित यंत्रणेत आहे. यामुळे टोल भरण्यासाठी होणारी दगदग, सुट्टे पैसे आदींचा ताण कमी होणार आहे. तसेच यामुळे महामार्गावरील वाहनांच्या रांगा कमी होणार आहेत.

मध्यरात्रीपासून कारवाई

मध्यरात्रीपासून फास्टॅग सक्तीचा केल्यानंतर हे स्टीकर नसलेल्या वाहनांना नेहमीपेक्षा दुप्पट टोलचा भुर्दंड भरावा लागत आहे. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग (एनएच 60) वर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर हीच परिस्थिती उद्भवली आहे. या टोलनाक्याच्या परिसरातील 20 किलोमीटरवरील स्थानिकांनाही याचा फटका बसण्यास सुरवात झाली आहे.

स्थानिकांमध्ये असंतोष

स्थानिक व्यवसायिक वाहतूकीच्या वाहनांसाठी टोलनाका प्रशासनाने 285 रुपये मासिक पासची सक्ती केल्याने, स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. किरकोळ कारणांसाठी शहरात दररोज येणे अनिवार्य असल्याने, टोलची सक्ती परवडणारी नाही. फास्टॅग स्टीकर घेतल्यास, आपोआप खात्यावरुन पैसे वर्ग होत असल्याने काय करावे हा प्रश्न बाहेर प्रवास करणाऱ्या खासगी वाहन धारकांना पडला आहे. 

या टोलनाक्यावर मोटारीसाठी 85 ऐवजी 170 तर मालवाहतूकीच्या ट्रकसाठी 280 रुपयांऐवजी 560 रुपये आकारले जात आहेत. तर स्थानिक व्यावसायिक वाहनांकडून अर्ध्या रकमेचा टोल घेतला जात आहे. फास्टॅग विक्रीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात 40 हजार केंद्राद्वारे तसेच टोलनाक्यावर व्यवस्था केली आहे.

फ्लिपकार्ट, पेटीएम किंवा तत्सम डिजीटल वॉलेटद्वारे किंवा आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, कोटक, अॅक्सिस सारख्या बँकांच्या माध्यमातूनही फास्टॅग खरेदी करण्याची व्यवस्था केल्याची माहिती व्यवस्थापक अमित राणा यांनी दिली आहे. 

खुष्कीचा मार्ग आला कामी

टोलनाक्याच्या पूर्वेला हिवरगाव पावसा तर पश्चिमेला झोळे गाव आहे. या गावांसाठी उड्डाणपुलाजवळून उपरस्ते काढले आहेत. मध्यरात्रीपासून वाहनांच्या रांगा वाढल्यानंतर माहितगार स्थानिकांनी टोलनाका टाळण्यासाठी झोळे गावातून एक किलोमिटर अंतरावरील आडवा ओढा मार्गे तर, काहींनी हिवरगाव पावसा गावातून तीन किलोमीटर संगमनेरच्या दिशेने निघणाऱ्या उपरस्त्याचा वापर करुन पैसे वाचवले. त्यांचे अनुकरण इतरांनीही केल्याने, रात्रभर वाहनांच्या आवाजाने ग्रामस्थांच्या झोपा उडाल्या.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com