कर्जतमध्ये विद्यालयासमोरील अतिक्रमण हटवण्यासाठी विश्‍वस्त नेटके यांचे उपोषण

नीलेश दिवटे
Tuesday, 6 October 2020

बेनवडी येथील कर्जत राशीन रस्त्यालगत असलेल्या हरिनारायन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोरील तसेच रस्त्या लगतची अतिक्रमणे तात्काळ हटवावित या मागणीसाठी संस्थेचे संस्थापक व कार्यकारी विश्वस्त चंद्रकांत नेटके यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यातील बेनवडी येथील कर्जत राशीन रस्त्यालगत असलेल्या हरिनारायन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोरील तसेच रस्त्या लगतची अतिक्रमणे तात्काळ हटवावित या मागणीसाठी संस्थेचे संस्थापक व कार्यकारी विश्वस्त चंद्रकांत नेटके यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित निमकर यांनी सदर अतिक्रमणे नियमानुसार काढू, असे लेखी आश्वासन तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे समक्ष दिले. मात्र अतिक्रमणे काढण्याची निश्चित तारीख द्या या मागणीवर आंदोलक नेटके ठाम राहिल्याने काल रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही.

याबाबत संस्थापक नेटके यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तालुक्यातील बेनवडी येथील हरी नारायण स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे समोर अनधिकृत टपऱ्याची अतिक्रमणे असून वारंवार निवेदने देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. ती तात्काळ काढण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत संबंधितांना नोटिसा बजाविण्यात आल्याअसून नियमानुसार पोलिस बंदोबस्तात सदर अतिक्रमणे काढली जातील. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, तसे लेखी दिले आहे, असे निमकर यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fasting to remove encroachment in front of school in Karjat