
बाजारतळाजवळ असणाऱ्या खंडेश्वरवाडीत पहाटे जंगली जनावराचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ भयभयीत झाले आहे.
भाळवणी (अहमदनगर) : येथील बाजारतळाजवळ असणाऱ्या खंडेश्वरवाडीत पहाटे जंगली जनावराचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ भयभयीत झाले आहे. प्रशांत उपाध्ये यांच्या घराजवळील वाळूत मंगळवारी पहाटे पाच-साडेपाचच्या दरम्यान या जनावराचे दर्शन झाले.
अनेक जणांनी या प्राण्याच्या अंगावर पट्टे असल्याचे सांगितले त्यामुळे हा प्राणी तरस, वाघ कि बिबट्या याबाबत ग्रामस्थांत चर्चा चालू आहे.फटाके फोडल्यानंतर सदर प्राणी झाडाझुडपाचा आधार घेत नदीच्या बाजूला गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान भांडगाव, जामगाव, हिवरे कोरडा आदी भागात वाघीनीचे दोन बछड्यासह वास्तव्य असून अनेक शेतकरी व ग्रामस्थांना दर्शन झाले आहे.सध्या रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात जातात. रात्री विजपुरवठा असल्याने शेतकऱ्यांना रात्री पाणी भरण्यासाठी जावे लागते.
बिबट्यांच्या दर्शनामुळे शेतकरी हतबल झाले असून पाणी देण्यासाठी जावे तर बिबट्याची भिती अन न जावे तर पिक हातातून जाण्याची भिती अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.वनविभागाकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे.वनविभागाने या भागात पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
संपादन : अशोक मुरुमकर