अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदासाठी 'फिल्डिंग' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदासाठी 'फिल्डिंग'

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या दोन तज्ज्ञ संचालकपदांवर उद्या (ता. २६) संचालक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत निवड होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ संचालक म्हणून जिल्हा बँकेत संधी मिळावी, यासाठी नेत्यांकडे कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली असल्याचे दिसत आहे. तज्ज्ञ संचालकपदावर कोणाला संधी मिळते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत मंत्री, माजी मंत्री, आमदार, माजी खासदार, माजी आमदार यांच्यासह जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती असलेले २१ संचालक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय शेळके बँकेचे अध्यक्ष असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव कानवडे उपाध्यक्ष आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्ह्यातील नेत्यांच्या पुढाकाराने निवडणूक बिनविरोध झाली. भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचेही या बँकेवर वर्चस्व आहे.

जिल्हा बँकेत आता दोन तज्ज्ञ संचालकांची निवड करण्यात येणार आहे. बँकेवरील पक्षीय वर्चस्व पाहता, एक संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, तर एक संचालक काँग्रेस पक्षाचा असेल, असा अंदाज बांधला जात आहे. उद्या (शुक्रवारी) जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवड होत असून, या बैठकीत तज्ज्ञ संचालक निवडले जाण्याची शक्यता आहे. नेहमीचा अनुभव पाहता, नेते सुचवतील त्या व्यक्तीला तज्ज्ञ संचालक म्हणून संधी दिली जाते. तज्ज्ञ संचालकाची निवड होणार असल्याचे कळताच इच्छुक कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांकडून या पदावर कोणाला संधी मिळते, याकडे नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

"जिल्हा बॅंकेच्या तज्ज्ञ संचालक निवडी निकषानुसार आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार होतील. योग्य व्यक्तीला संधी मिळेल."

- उदय शेळके, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅक

loading image
go to top