
राहुरी : शहरात तीन पोलिसांचे भांडण पेटले. पंधरा-वीस मिनिटे शाब्दिक चकमक उडाली. भांडण विकोपाला गेले. दोघेजण एकाला भिडले. एकट्या पडलेल्याने दगड उचलून भिरकावला. दोघांतील एकाच्या पाठीत रप्पकन दगड लागला. तसा, तो जीवाच्या आकांताने ओरडत खाली बसला. बघ्यांची गर्दी जमली. तिघेही भानावर आले. त्यांनी, लगेच काढता पाय घेतला. भांडणाचे कारण 'कलेक्शन' असल्याचे दबक्या आवाजात पोलिस वर्तुळातून बाहेर आले.
काल (शुक्रवारी) सायंकाळी साडेसात वाजता नगर-मनमाड मार्गावर तुतारी हॉटेलजवळ पानाच्या टपरी समोरील बाकड्यावर तीन पोलीस बसले. एकमेकांचे उणेदुणे काढण्यास त्यांनी सुरुवात केली. भांडण सुरू झाले. तिघांचेहीआवाज वाढले. जनतेची भांडणे मिटविणारे पोलीस एकमेकांशी कशासाठी भांडत आहेत. याचे बघ्यांना आश्चर्य वाटले. भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. तीस-चाळीस बघे स्तब्ध झाले. दगडाच्या फटक्याने एकजण कळवळून खाली बसला. मग, सर्वजण भानावर आले. काही घडलेच नाही. अशा थाटात तिघांनी घटनास्थळ सोडले.
आज (शनिवारी) पोलिस वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. तेंव्हा घटनेची बिंग फुटले. समजलेली हकिगत अशी : आरडगाव, मांजरी बीटचे हवालदार 'कलेक्शन' मध्ये 'गफला' करतात. अशी माहिती 'वळण' चे 'कलेक्शन' करणाऱ्या हवालदाराने साहेबांना सांगितले. साहेबांची खप्पा मर्जी झाली. त्यांनी 'कलेक्शन' एजंट बदलले. राहुरी बीटच्या दोन हवालदारांवर जबाबदारी सोपविली. परंतु, आरडगाव, मांजरी बीटचे हवलदार 'कलेक्शन' चे काम सोडायला तयार नव्हते. त्यांनी, "साहेबांनी आमच्याकडे तालुक्याचे 'कलेक्शन' सोपवले आहे. दुसऱ्या कोणाकडेही 'कलेक्शन' देऊ नका." असे दोन नंबर धंदेवाल्यांना सांगितले. साहेबांनी नव्याने नेमलेले हवालदारांना 'कलेक्शन' मिळणे कठीण झाले.
दरम्यान, 'वळण' च्या हवालदाराने चुगली केली. या रागातून 'त्या' दोघांनी वळण बीटच्या दोन नंबर धंदेवाल्यांना निरोप दिला. "यापुढे 'वळण' च्या हवालदाराकडे कलेक्शन देऊ नका. साहेबांनी तालुक्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे." वळणचे कलेक्शनही बंद पडले. वळणच्या हवालदाराला माहिती समजली. तशी वादाची ठिणगी पडली. लॉकडाऊन असले. हॉटेल, पानटपऱ्या बंद असल्या. तरी, त्यांचे भेटण्याचे ठिकाणी निश्चित असते. काल सायंकाळी तिघेही एकत्र आले. भांडणाचे रुपांतर मारामार्यात झाले. साहेबांना घटना समजताच, त्यांनी डोक्याला हात लावला. वाद नकोत. म्हणून, त्यांनी पूर्वीप्रमाणेच 'कलेक्शन' ची जबाबदारी कायम ठेवली. भांडणावर पडदा टाकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.