चीनचा निषेध माजी आमदार राठोड यांना पडला महागात, २८जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

हुतात्मा झालेल्या आपल्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच चिनीचा निषेध करण्यासाठी ते जमले होते. मात्र, सध्या जमावबंदी असल्याने प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

नगर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह 28 जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब मारूती बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे, माजी नगरसेवक सुरेश रत्नप्रसाद तिवारी, संतोष गेणाप्पा, विक्रम अनिल राठोड यांच्यासह वीस जणांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे.

हेही वाचा - जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे पोलिसांच्या ताब्यात

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फौजदारी संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येण्यास मनाई केली आहे.

वरील लोकांनी दिल्लीगेट येथे एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले, असे सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यानी फिर्यादीत म्हटले आहे. चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. हुतात्मा झालेल्या आपल्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच चिनीचा निषेध करण्यासाठी ते जमले होते. मात्र, सध्या जमावबंदी असल्याने प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against former MLA Anil Rathore