esakal | रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

4remdesivir_3

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

श्रीरामपूर ः चढ्या दराने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची विक्री करताना काल (मंगळवारी) शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी संजय रूपटक्के (रा. मोरगे वस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. न्यायालयासमोर आज हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शुभम श्रीराम जाधव (रा. कोल्हार, ता. राहाता) व प्रवीण प्रदीप खुणे (रा. भातंब्री, ता. बार्शी, जि. सोलापूर), अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील प्रभाग सहामध्ये एका रुग्णालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन 20 हजार रुपयांना विकताना जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

त्याच्याकडून एक इंजेक्‍शन, दुचाकी, स्मार्ट फोनसह 26 हजार रुपये जप्त केले होते, तर खुणे पोलिसांना चकवा देत पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती देत, चौकशी करून रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पसार आरोपी खुणे यालाही रात्री उशिरा ताब्यात घेतले. आज दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

दरम्यान, कोरोनाच्या संकटात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाईच्या मागणीसाठी भाजपचे प्रकाश चित्ते यांनी काल सायंकाळी शहरातील गांधी पुतळ्यासमोर उपोषण करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले.