शेतीला शुद्ध पाणी देण्यासाठी प्रत्यक विहिरीवर फिल्टर

शांताराम काळे
Sunday, 13 December 2020

माती आणि शेतकऱ्यांचे अतूट नाते आहे. शेतकऱ्यांमुळे काळी आई आजारी पडली आहे.

अकोले (अहमदनगर) : माती आणि शेतकऱ्यांचे अतूट नाते आहे. शेतकऱ्यांमुळे काळी आई आजारी पडली आहे. याचे भान त्याला नाही. भविष्यात शेतकऱ्यांना, पाणी शुद्ध करून ते शेतीला देण्यासाठी प्रत्येक विहिरीवर फिल्टर बसवावे लागतील, असा इशारा कृषितज्ज्ञ नारायण घुले यांनी दिला. 

अकोले येथील अंबिका मंगल कार्यालयात झालेल्या मृदा आरोग्यपत्रिका कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक शांताराम गजे होते. तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, टाकळीचे सरपंच रामहरी तिकांडे, अनिल देशमुख, आत्माचे तंत्रज्ञ बाळनाथ सोनवणे उपस्थित होते. 

घुले म्हणाले, शेतकरी उत्पादन मिळविण्यासाठी भरमसाट खर्च करतो. त्यातून किती पैसा मिळाला, याचा विचार करीत नाही. भरमसाट रासायनिक खते, पाणी व कीटकनाशके वापरून काळी आई आजारी पाडली. याचे भानही त्याला नाही. जमीन व पाणी नासल्याने भविष्यात पिकणारच नाही. याचा विचार करून शेतकऱ्यांनी वेळीच सेंद्रिय शेतीची कास धरावी. आजारी पडलेली काळी आई वाचवावी.'' 

गिरीश तळोले, शांताराम गजे, संपत वाकचौरे यांनी विचार मांडले. कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी प्रास्ताविक, बाळनाथ सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊ खरात यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filters on each well to provide pure water to the farm