अखेर नगरच्या जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांची बदली, बुलढाण्यावरून शेखर पाटील आले

अमित आवारी
Tuesday, 11 August 2020

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही असहकाराचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे राज्य सरकारला नावंदे यांच्या चौकशीसाठी तीन वेळा समित्या पाठवला लागल्या.

नगर : विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची अखेर बदली झाली. त्यांच्या बदलीसाठी नगरमधील बहुतांशी क्रीडा संघटनांनी देव पाण्यात घातले होते. त्यांच्या बदलीसाठी संघटनांनी असहकार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते.

नावंदे यांची राज्य पातळीवरून तीन वेळा चौकशी समिती मार्फत चौकशी करण्यात आली होती. रात्री त्यांच्या बदलीचे आदेश आले. त्यांच्या बदलीची माहिती मिळताच क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले.

वर्षापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांची पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर कविता नावंदे यांना नगरमध्ये क्रीडा अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली होती. नावंदे यांनी पदभार स्वीकारताच वाडिया पार्क मैदानावर मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार त्यांनी वाडिया पार्क मैदानात प्रवेशशुल्क आकारण्यास सुरुवात करून आयाराम-गयाराम यांचा प्रवेश बंद केला.

या शिवाय मैदानात क्रीडा प्रशिक्षण देत असलेल्या क्रीडा संघटनांना शुल्क लावले. त्यामुळे क्रीडा संघटनांमध्ये नाराजी वाढली. वाडिया पार्क मैदानात स्पर्धा घ्यायचा असल्यास त्यासाठी शुल्कवाढ केली. त्यामुळे क्रीडा संघटनांनी वाडिया पार्कमध्ये स्पर्धा घेणे बंद केले.

नावंदे यांच्या निर्णयाच्या भीतीने कित्येक क्रीडा संघटनांनी आपल्या स्पर्धा रद्द केल्या. नावंदे यांनी क्रीडा शिक्षकांवर व तालुका क्रीडा समित्यांवर पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धाांंसंदर्भात नवीन नियम तयार केले. या नियमांना कंटाळून क्रीडा संघटनांनी असहकाराचे हत्यार उपसले. या असहकार आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही असहकाराचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे राज्य सरकारला नावंदे यांच्या चौकशीसाठी तीन वेळा समित्या पाठवला लागल्या. या समित्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आजअखेर नावंदे यांची बदली करण्यात आली. नावंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या भूसंपादन विभागाचे कार्यालय वाडिया पार्कमधून स्थलांतरित करण्यास भाग पाडल्यामुळे महसूल प्रशासनातील काही अधिकारी नाराज होते. त्यांनीही नावंदे यांच्याविरोधात राज्य शासनाकडे तक्रार केली होती, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

कविता नावंदे या आता हिंगोलीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी असणार आहेत. बुलढाण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांची नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन बदलामुळे नगरच्या क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, Ahmednagar District Sports Officer Kavita Navande was transferred