esakal | पॅथॉलॉजी लॅब बनल्यात लुटीचे केंद्र, अनाधिकृत केंद्रांचा सुळसुळाट
sakal

बोलून बातमी शोधा

Financial plunder of the common man from the pathology lab

रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

पॅथॉलॉजी लॅब बनल्यात लुटीचे केंद्र, अनाधिकृत केंद्रांचा सुळसुळाट

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी : तालुक्‍यातील रक्त-लघवी तपासणी केंद्रांतून (पॅथॉलॉजी लॅब) रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू आहे. परावैद्यक परिषदेकडे नोंदणी नसलेले अनेक जण जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्त-लघवी तपासणी केंद्र चालवीत आहेत.

रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत गायकवाड यांनी केली आहे. 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी याबाबत नोटीस पाठवून, दोषींवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व पॅथॉलॉजी लॅबधारकांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व इतर आजारांसाठी डॉक्‍टरांकडे गेल्यानंतर रुग्णांना विविध तापसण्या करण्यास सांगितले जाते. त्यासाठी रक्त-लघवी तपासणी केंद्रात जावे लागते. तेथील अहवालानंतरच उपचाराची निश्‍चिती होते. मात्र, जिल्ह्यातील पॅथॉलॉजी लॅबचालक परवानगी नसताना जास्त पैसे उकळतात.

तालुक्‍यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत. एकट्या पाथर्डी तालुक्‍यात अठरा ते पंचवीस लॅब आहेत. परवानगी नसणाऱ्या अशा हजारो पॅथॉलॉजी लॅब जिल्ह्यात सुरू आहेत. विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या अशिक्षित रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जाते.

खरवंडी, तिसगाव, मिरी, करंजी परिसरात सात जण पात्रता नसताना तपासणी केंद्रे चालवीत असल्याची तक्रार गायकवाड यांनी मुंबईतील परावैद्यक परिषदेकडे केली आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 

रक्त-लघवी तपासणी केंद्राला परावैद्यक परिषदेकडे नोंदणी करणे 2017च्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. पाथर्डीतून तपासणी केंद्रांबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्हाभरात नोंदणी नसणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- कुमार पाटील, संचालक, परावैद्यक परिषद, नगर 

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी अवैध रक्‍त-लघवी तपासणी केंद्रे सुरू आहेत. तेथून रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे. चुकीचे अहवाल दिल्याचेही अनेकदा समोर आले आहे. परवानगी न घेता काम करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचालकांवर कायदेशीर कारवाई व्हावी. 
- चंद्रकांत गायकवाड, पाथर्डी 

loading image