नगर जिल्ह्यात वीज प्रकल्पात बिबट्याचा वावर; फोटो पाहून तुम्हीच सांगा किती आहेत पिल्ले

शांताराम काळे
Tuesday, 25 August 2020

कोदणी वीज प्रकल्पात १५ दिवसांपासून एका बिबट्याने बछडांना जन्म दिला आहे.

अकोले (अहमदनगर) : कोदणी वीज प्रकल्पात १५ दिवसांपासून एका बिबट्याने बछडांना जन्म दिला आहे. ती रोज रात्री मध्यरात्री, पहाटे, वीज प्रकल्पातून जात येत असते.  त्यामुळे येथील वीज प्रकल्पाचे २१ कर्मचारी दिवसा काम करून रात्रपाळीचा कर्मचारी आपल्या कंट्रोल कॅबिनमध्ये स्वतः ला बंद करून रात्र घालवत आहे. 

याबाबत वनविभागाचे वनक्षेत्रपाल गोंदके यांनी याबाबत तातडीने पिंजरा लावला असून त्यात शेळी ठेवली आहे. मात्र वीज कर्मचाऱ्यांना गेट उघडे ठेवण्यास सांगण्यात आले असून दुपारी चारनंतर वीज प्रकल्पात कुणीही न थांबता रात्र पाळीचे कर्मचारी कंट्रोल कॅबिनमध्ये बसून असतात. रोज त्यांना हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरातून दिसतो, अशी माहिती वीज प्रकल्पाचे भगवान गुरव यांनी सांगितले आहे.

वीज प्रकल्पाच्या मागे कोदणी शिवारात ऊस शेती आहे. तेथील शेतकऱ्यांनाही हे बछडे व बिबट्या मादी दिसल्याचे सोमनाथ बांबेरे यांनी सांगितले आहे. सध्या वीज प्रकल्प बंद असून या प्रकल्पाच्या सभोवताली प्रवरा नदी व दाट झाडी असल्याने सध्या कर्मचारी जीव मुठीत धरून या वीज प्रकल्पात काम करीत आहे. हा बिबट्या मादी ६ ऑगस्टला येथे वास्तव्यास आली, तेव्हापासून ती सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या दिवसात तिची प्रसुतीच झाली आहे. 

१५ दिवसानंतर ते आपल्या पिलांसह जागा बदलतात. त्यामुळे पिंजरा लावला असला तरी बछड्यांची व तिची ताटातूट होऊ नये म्हणून वनविभागाने वनपाल चव्हाण, वनरक्षक करवंदे, बेनके यांना या वाघिणीच्या संरक्षणार्थ या भागात दिवस रात्र ठेवून तिच्यावर लक्ष्य ठेवण्यात येत असल्याची  वनक्षेत्रपाल जी. जी. गोंदके यांनी सांगितले. डॉटसन वीज केंद्राचे अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन या बिबट्याला गेट उघडे ठेवून जाऊ द्यावे, मात्र तुम्ही कंट्रोल कॅबिन मधूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

कोदणी ग्रामस्थांनीही सतर्कता बाळगत रात्रीच्या वेळी बॅटरी घेऊन व काम असेल तरच बाहेर पडावे असे सांगितले आहे. मात्र सध्या जीव मुठीत धरून कर्मचारी बिबट्या तिच्या पिलांना जपण्यासाठी रात्र जागवून काढताना दिसत आहेत. लवकरच ही बिबट्यची मादी निघून जाईल, असे वनविभागाचे मत असून त्याप्रमाणे तिच्या सुखरूप जाण्याची वाट २१ कर्मचारी व कोदणी ग्रामस्थ पाहत आहेत

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find out how many leopard cubs there are in this photo