
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळांवर नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळांवर नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच या परिसरात थुंकण्यास मनाई केली आहे. नियम न पाळल्यास शंभर रुपये दंड करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सार्वजनिक ठिकाणी, तसेच धार्मिक स्थळांच्या परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश पोलिस प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार विनामास्क फिरणारे वा थुंकताना आढळून आल्यास संबंधितांवर शंभर रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या चौकांत पोलिस व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी तैनात केले आहेत.
महापालिकेनेही कारवाईसाठी तीन पथके तैनात केली आहे. धार्मिक स्थळांवर सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे निर्देश यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. धार्मिक स्थळांवर अस्वच्छता करताना आढळून आल्यास, संस्थेकडून स्वच्छतेचा खर्च वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.
संपादन : अशोक मुरुमकर