‘सैनिक’ बँकेकडून फसवणुक; कर्जाची परतफेड करुनही मालमत्तेचा लिलाव

मार्तंड बुचुडे
Sunday, 11 October 2020

कर्जाची परत फेड करूनही पारनेर सैनिक सहकारी बँकेकडून पुन्हा कर्जदारकडे ती रक्कम थकीत दाखवली.

पारनेर (अहमदनगर) : कर्जाची परत फेड करूनही पारनेर सैनिक सहकारी बँकेकडून पुन्हा कर्जदारकडे ती रक्कम थकीत दाखवली. कर्जदाराच्या मालमत्तेचा बँकेने बेकायदेशीर लिलाव केल्याप्रकरणी बँकेच्या विद्यमान अध्यक्ष शिवाजी व्यवहारे व माजी अध्यक्ष अर्झुन चौधरी यांच्यासह तेराजणांवर पारनेर पोलिस ठाण्यात पुरूषोत्तम शहाणे (रा. सुपे) यांच्या फिर्यादीवरूऩ गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

पुरुषोत्तम शहाणे यांचा भाऊ राजेंद्र शहाणे यांनी सैनिक सहकारी बँकेकडून व्यवसायासाठी सहा लाख रूपये कर्ज घेतले होते. या कर्जाची थकीत रकमेसह परत फेड केली तरी सुद्धा बँकेला अधिकार नसतानाही बेकायदेशीररित्या शहाणे यांच्या तारण मलमत्तेचा लिलाव केल्याप्रकरणी बँकेचे विद्यमान अध्यक्ष व्यवहारे तसेच माजी अध्यक्ष चौधरी यांच्यासह तत्कालीन कामगार तलाठी करपे,  मंडलाधिकारी दाते (पुर्ण नाव माहीत नाही) व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, वसुली अधिकारी प्रवीण निघोट, व्यवस्थापक आप्पासाहेब थोरात, अनिल मापारी, दत्तात्रय भुजबळ, रमेश  मासाळ, भरत पाचारणे, अरूण आवारी व संतोष भानगडे या 13 जणांवर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कर्जाची रक्कम भरली असतानाही ती थकीत दाखवून तारण ठेवलेल्या जमिनीचा बेकायदेशीररित्या लिलाव केला आहे. 14 फेब्रुवारी 2011 ला पारनेर सैनिक बँक पारनेर शाखेतून पुरुषोत्तम शहाणे यांचा भाऊ राजेंद्र शहाणे यांनी व्यवसायासाठी सहा लाखाचे कर्ज काढले होते. ते थकीत झाल्याने त्याची व्याजासह थकीत रक्कम 26 लाख 33 हजार रूपये इतकी झाली होती. कर्जदाराने ती रक्कम व्याजासह परतफेड केली असताना ती थकित असल्याचे दाखवून त्या कर्जापोटी तारण असलेल्या मालमत्तेचा बँकेला कोणताही अधिकार नसतानाही बँकेने बेकायदेशीर लिलाव केला. 

शिवाय लिलाव प्रक्रीयाही बोगस पद्धतीने राबवून तेथे त्या वेळी हजर नसलेल्या व्यक्तीची खोटी सही करून आम्हा दोघा भावांची फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत पुरूषोत्तम शहाणे यांनी म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पारनेर पोलिस ठाण्यात वरील 13 जणांविरोधात संगनमताने फसवणुक केल्याचा पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी पद्मने करत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A FIR of bank fraud has been registered in Parner taluka