अवघ्या १० महिन्यांतच नवविवाहितेचे स्वप्न भंगले; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा

आनंद गायकवाड
Wednesday, 14 October 2020

अवघ्या 10 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेचा, ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरुन चार लाख रुपये आणण्यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याने तिने आत्महत्या केली.

संगमनेर (अहमदनगर) : अवघ्या 10 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेचा, ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरुन चार लाख रुपये आणण्यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याने तिने आत्महत्या केली. याबाबत तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन पती, सासरा व सासूविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी पती व सासऱ्याला ताब्यात घेतले आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, पूनम ( वय 23 ) हीचा विवाह तालुक्यातील निमगाव खुर्द येथील अमोल आबासाहेब कासार याच्याशी 10 महिन्यांपूर्वी झाला होता. तिच्या वडीलांचे निधन झाले असून, एक लहान भाऊ आहे. विवाहानंतर काही दिवसातच ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरुन चार लाख रुपये आणण्यासाठी सासू सासऱ्यांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. मात्र याकडे माहेरच्या मंडळींनी दुर्लक्ष केले. या छळाला वैतागून पूनम हिने शनिवार ( ता. 10 ) रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

या प्रकरणी तिचा भाऊ सौरभ विलास हासे, रा, चिखली, ता. संगमनेर याने तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन, पोलिसांनी सासरा आबासाहेब, सासू अलका व पती अमोल कासार यांच्याविरोधात हुंड्यासाठी छळ करुन, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल केला असून, पती व सासऱ्याला अटक केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A FIR of marital suicide has been registered with Sangamner police