फवारणी सुरु असतानाच गाडीला आग; जीव मुठीत धरुन वाहनातले कर्मचारी पळाले

संजय आ. काटे
Wednesday, 12 August 2020

शहरात फवारणी करणाऱ्या पालिकेच्या घंटागाडीत मांडलेले फॉगिंग मशिनच काल सायंकाळी पेटले.

श्रीगोंदे (अहमदनगर) : शहरात फवारणी करणाऱ्या पालिकेच्या घंटागाडीत मांडलेले फॉगिंग मशिनच काल सायंकाळी पेटले. शहरातील काळकाई चौकात गॅस एजन्सीलगतच मशिनला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. काही वेळातच अग्निशामक बंबाने आग आटोक्‍यात आणली. 

पालिकेने तब्बल आठ लाख रुपये खर्चून फॉगिंग मशिन घेतले. खरेदीला महिना होत असतानाच, या मशिनला काळकाई चौकात आग लागली. फॉगिंग मशिन कचरा जमा करणाऱ्या घंटागाडीत ठेवून शहरात नेहमीप्रमाणे फिरवले जात होते. काळकाई चौकात फवारणी सुरू असताना, मशिनने अचानक पेट घेतला.

वाहनातील चालक, कर्मचारी जीव मुठीत धरून पळाले. बघता बघता घंटागाडीने पेट घेतला. त्यात टायर फुटल्याने मोठा आवाज झाला. नागरिकांनी आग विझविण्यासाठी पाणी फेकले; पण आग वाढतच गेली. शेवटी अग्निशामक बंब आला आणि आग आटोक्‍यात आली. 

घटनास्थळापासून जवळच भानेश्‍वर गॅस एजन्सी आहे. त्यांनी सिलिंडर असणारी वाहने घाईने हलविली. सुनील चाकणे म्हणाले, की आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आणून दिल्यावर चालक व कर्मचारी बाजूला झाले. काही नागरिकांनी पाणी फेकले; मात्र ते अपुरे पडत होते आणि आग वाढत होती. त्यामुळे गोंधळ उडाला. नागरिकांनी समजूतदारपणा दाखविल्याने अनर्थ टळला.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश बोरुडे यांनी पालिकेच्या कारभाराकडे बोट दाखवीत मशिन, घनकचरा जमा करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणाच्या चौकशीची मागणी केली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at the newly taken fogging machine of the municipality in Shrigonda taluka