पहिल्याच दिवशी साडेतीन हजार भक्तांनी घेतले शनिदर्शन

विनायक दरंदले
Tuesday, 17 November 2020

राज्य सरकारच्या परवानगीनंतर सोमवारी पाडव्याच्या दिवशी पहाटे साडेचारच्या आरती सोहळ्यानंतर स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन खुले करण्यात आले.

सोनई (अहमदनगर) : राज्य सरकारच्या परवानगीनंतर सोमवारी पाडव्याच्या दिवशी पहाटे साडेचारच्या आरती सोहळ्यानंतर स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन खुले करण्यात आले. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे सुमारे आठ महिने मंदिर बंद होते. मंदिर खुले केल्यानंतर पहिल्याच दिवशी दिवसभरात साडेतीन हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

सोमवारी पहाटे साडेचार वाजता 'सुर्यपुत्र शनिदेव की जय'च्या जयघोषात महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी पौरहित्य केले. यावेळी मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते.आरती सोहळ्यानंतर महाद्वार समोरील संरक्षण कठडे काढून भाविकांना प्रवेश देण्यात आला.

मंदीर बंद झाल्यापासून येथील व्यावसाय बंदच असल्याने आज पहिल्या दिवशी दहा टक्केच दुकाना उघडल्या होत्या.मंदीर प्रशासनाने महाद्वारात हात-पाय धुण्याची व्यवस्था केली. चौथ-यापर्यंत पुजा साहित्याला बंदी असतानाही भाविकांच्या हातात पुजेचे ताट दिसत होते. सायंकाळी झालेल्या आरतीला सुरक्षित अंतर ठेवून शंभर भाविक उपस्थित होते.सर्वांनी चौथ-या खालुनच दर्शन घेतले.

ट्रस्टच्या वतीने उद्यापासून इ-पासची व्यवस्था करण्यात आली असून बाहेरचे भाविक शनिदेव डाॅट काॅम या वेबसाईटवर पास काढू शकतात.गावात वाहनतळातील भक्तनिवास नोंदणी कार्यालयात पासची व्यवस्था करण्यात आली आहे.
- नितीन शेटे, तांत्रिक अधिकारी, शनैश्वर देवस्थान

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the first day alone three and a half thousand devotees took Shanidarshan