
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने जाहीर केला.
शेवगाव (अहमदनगर) :अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा 22 कोटी 71 लाख रुपयांचा पहिला हप्ता 53 गावांतील 29 हजार 405 शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
रब्बी पिकाच्या तयारीसाठी मिळालेले हे अनुदान शेतकऱ्यांना उपयोगी पडणार असले, तरी उर्वरित गावांतील शेतकऱ्यांना मात्र दुसऱ्या टप्प्याच्या मदतीसाठी वाट पाहावी लागणार आहे. यंदा जूनपासून तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कपाशी, तूर, सोयाबीन, कांद्यासह ऊस व फळबागांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्याने, केलेला खर्च वाया गेला. सरकारने नुकसानीची दखल घेऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही तालुक्याचा दौरा करून पिकांसाठी हेक्टरी 10 हजार, तर फळपिकासाठी 25 हजार रुपयांप्रमाणे मदत जाहीर केली. तालुक्यातील 73 हजार 279 शेतकऱ्यांच्या 48 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यात कपाशी 70 हजार 802, तूर 4 हजार 810, कांदा 1 हजार 895, भुईमूग 810, आले 340, केळी 71, पपई 30, फळपिके 231 हेक्टर आदींचा समावेश आहे.
सरकारकडून नुकसान भरपाईपोटी तालुक्याला 48 कोटी 50 लाखांचा निधी मिळणे आवश्यक आहे. त्यातील पहिल्यात टप्प्यात 24 कोटी 23 लाख रुपये तालुका प्रशासनाला प्राप्त झाले. त्याचे 53 गावांतील 29 हजार 405 शेतकऱ्यांच्या 22 हजार 800 हेक्टर बाधित पिकांसाठी 22 कोटी 71 लाख रुपये बॅंक खात्यांवर वर्ग केले आहेत. उर्वरित गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त होताच दुसऱ्या टप्प्यात वितरित केली जाणार असल्याचे तहसीलदार अर्चना भाकड यांनी सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर