esakal | राज्यात प्रथमच नगर जिल्ह्यात पाणी योजनेसाठी होणार सौरउर्जेचा वापर
sakal

बोलून बातमी शोधा

For the first time in the state, solar energy will be used for water scheme in Nagar district

राज्यात प्रथमच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी सौरउर्जेचा वापर होणार आहे.

राज्यात प्रथमच नगर जिल्ह्यात पाणी योजनेसाठी होणार सौरउर्जेचा वापर

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : राज्यात प्रथमच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी सौरउर्जेचा वापर होणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या वतीने 30 लाखाचा निधी दिला असल्याची माहिती, काँग्रेसचे गटनेते व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांनी दिली.

फटगरे म्हणाले, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका प्रतिकूलतेतून विकासात्मक वाटचाल करीत, राज्यात मॉडेल ठरला आहे. तालुक्याच्या ग्रामीण विकासावर भर देताना प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेने 2019 मध्ये कृषी विभागाच्यावतीने ग्रामपंचायतींच्या सौर उर्जेकरता, प्रायोगिक तत्त्वावर तीन ग्रामपंचायतसाठी 30 लाखांचा निधी संगमनेर तालुक्याला दिला आहे. या अंतर्गत कासारे येथे 10 लाखाच्या निधीतून 335 वॅट क्षमतेच्या 24 सौर पॅनलची उभारणी होणार असून, यामधून दररोज 32 युनिट वीजनिर्मीती होणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीची दरवर्षी सरासरी 90 हजारांची बचत होणार आहे. 

शेंडेवाडी येथे साडेसात अश्वशक्तीच्या पंपावर 16 सौर पॅनल व सतिचीवाडी येथील साडेपाच अश्वशक्तीच्या विजपंपासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या निधीतून सौर पॅनल उभारले जाणार आहे. तर सारोळे पठार येथे 10 अश्वशक्तीच्या विज पंपासाठी 335 वॅट क्षमतेचे 32 सौरपॅनल उभारले गेले असून, यातून 40 युनिट वीजनिर्मीती होणार असून, ग्रामपंचायतीची दरवर्षी 1 लाख रुपयांची वीज बचत होणार आहे. यामुळे विज बिलाचा खर्च वाचणार असल्याने हा प्रकल्प राज्यात आदर्श ठरणार आहे. याकामी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, मीरा शेटे यांचीही मोलाची मदत झाली आहे.

या यशस्वी उपक्रमाबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, शंकरराव खेमनर, दुर्गा तांबे, सत्यजित तांबे, बाबा आहोळ, रणजितसिंह देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर