संगमनेरमध्ये पोलिसांकडून पाच जनावरांची सुटका; ५४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

आनंद गायकवाड
Saturday, 21 November 2020

मदिनानगर प्रभागातील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशाच्या पाच जनावरांची पोलिसांनी सुटका केली.

संगमनेर (अहमदनगर) : शहरातील मदिनानगर प्रभागातील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशाच्या पाच जनावरांची पोलिसांनी सुटका केली तसेच या वेळी 20 किलो गोवंशाचे मांस असा सुमारे 54 हजार रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, शहरातील मदिनानगर गल्ली क्रमांक पाचमध्ये निसाल अहमद कुरेशी हा एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करीत असल्याची माहिती, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त खबऱ्यामार्फत समजली होती.

या माहितीच्या आधारे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्यासह अमित महाजन, राजेंद्र डोंगरे, प्रमोद गाडेकर व सागर धुमाळ यांच्या पथकाने वरील ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात चार हजार रुपये किंमतीचे वीस किलो गोमांस व पन्नास हजार रुपये किंमतीचे तीन बैल व दोन गायी मिळून आल्या.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निसार अहमद कुरेशी याच्या विरुध्द प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सलीम शेख करीत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five animals rescued by police in Sangamner