बापरे! ३७ कोटी विम्यासाठी दिला कोब्राचा दंश; ५ मारेकरी गजाआड

five arrested for killing a man using Cobra snake for Rs 37 crore insurance crime news
five arrested for killing a man using Cobra snake for Rs 37 crore insurance crime news Google

अहमदनगर : भोळसर व्यक्तीचे अपहरण करून त्याला सर्पदंश घडवून खून केला. मृत व्यक्‍ती ही प्रभाकर भीमाजी वाघचौरे (वय ५४, रा. राजूर, ता. अकोले) असल्याचे आरोग्य विभाग आणि पोलिसांना भासविण्यात आले. त्याआधारे अमेरिकन विमा कंपनी ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीचा ३७ कोटी रुपयांचा विमा हडपण्याचा डाव पोलिस आणि विम्याची पडताळणी करणाऱ्या डेलिजन्स इंटरनॅशनल कंपनीने हाणून पाडला आहे. या खुनाच्या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

प्रभाकर भीमाजी वाघचौरे (वय ५४) हे १९९३ पासून अमेरिकेत स्वयंपाकी (कुक) म्हणून काम करीत आहे. त्याने तेथील ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीकडून विमा उतरविला होता. कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना प्रभाकर राजूर या मूळ गावी आला. त्याची सासुरवाडी धामणगाव पाट (ता. अकोले) आहे. त्यामुळे धामणगावला त्याचे जाणे-येणे होते. याच गावात भोळसर नवनाथ यशवंत अनाप (वय ५०) राहत होता. तो बऱ्याचदा गावातील एखाद्या चौकात बसून राहत असे. त्याला मारून, प्रभाकर वाघचौरे मृत झाला, असे दाखवायचे, त्याआधारे विम्याचे ३७ कोटी रुपये मिळवायचे, असा प्रभाकरचा कट होता. त्याने नवनाथशी मैत्री वाढविली. त्याला तो कधी खाऊ, तसेच कपडे देत होता. प्रभाकरचा मित्र संदीप तळेकर (रा. पैठण, ता. अकोले) याच्याशी त्याने या विषयावर चर्चा केली. आपला ७० लाखांचा विमा आहे. त्यातील निम्मी रक्कम सहभागींचा देण्याचे ठरविले. संदीप हा मोटार रिवाइंडिंगचे काम करीत होता. त्याच्या दुकानात या विषयावर चर्चा करून कट आखला जात होता. नवनाथला विहिरीत बुडवून ठार करायचे आणि मृत व्यक्‍ती प्रभाकर वाघचौरे असल्याचे भासविण्याचा कट प्रथम रचला. मात्र, या घटनेचा बोभाटा होईल, आपला बनाव उघडकीस येईल, या शक्‍यतेतून तो रद्द केला. नंतर सर्पदंशाने मृत्यू घडवून आणण्याचा कट रचला.

five arrested for killing a man using Cobra snake for Rs 37 crore insurance crime news
जिवलग मित्राच्या भेटीने शरद पवारही भारावले..

नेमके काय घडले?

आरोपींनी राजूर येथील सर्पमित्र हर्षद रघुनाथ लहामगे याला विषारी साप आणून देण्यास सांगितले. त्याने कोब्रा जातीचा विषारी नाग पकडून आणला. नवनाथला सर्पदंश घडवून ठार करायचे, रुग्णालयात घेऊन जायचे. त्याआधारे वैद्यकीय पुरावे आणि पोलिस रेकॉर्ड करण्याचा कट रचण्यात आला. प्रभाकरने मेव्हण्याचा मुलगा प्रशांत रामहरी चौधरी (रा. धामणगाव) आणि हरीश रामनाथ कुलाळ (कोंदणी) यांच्या मदतीने भोळसर नवनाथ अनापला कारमध्ये बसवून राजूरला आणले. तेथे एक खोली अगोदरच भाड्याने घेतली होती. नवनाथला तेथे कोंडून ठेवले. २२ एप्रिल २०२१ रोजी कोब्रा नाग ठेवलेली बरणी आणली. बरणीमध्ये हात घालण्यास त्याला भाग पाडले. तो हात घालण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे त्याला पुन्हा इंडिका कारमध्ये बसवून राजूरपासून एका निर्जनस्थळी नेले. तेथे सर्पमित्र हर्षदने बरणीमध्ये कोंडलेला नाग बाहेर काढला. त्याला नवनाथच्या पायाजवळ सोडून काठीने डिवचले. त्यामुळे नाग आक्रमक होऊन नवनाथच्या पायाला चावला.

नवनाथला पुन्हा कारमधून राजूरला भाड्याने घेतलेल्या खोलीत आणले. प्रभाकर वाकचौरे याने आपण प्रवीण वाकचौरे, असे खोटे नाव सांगून रुग्णवाहिकेसाठी १०८ या क्रमांकावर फोन केला. सर्पदंश घडवून आणलेल्या नवनाथला या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनही करण्यात आले. याप्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.

वैद्यकीय आणि पोलिस विभागातील कागदपत्रांच्या आधारे अमेरिकन विमा कंपनीकडे विमा रक्कम मिळण्यासाठी दावा दाखल करण्यात आला. विमा कंपनीने डेलिजन्स इंटरनॅशनल या कंपनीला या विम्याची खात्री करण्याचे काम सोपविले. या कंपनीचे प्रतिनिधी पंकज गुप्ता (मुंबई) यांनी पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास केला. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, राजूरचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, किरण साळुंके यांनी केलेल्या तपासात हा बनाव उघडकीस आला.याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रभाकर वाकचौरे, संदीप तळेकर, हर्षद लहामगे, हरीश कुलाळ, प्रशांत चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

five arrested for killing a man using Cobra snake for Rs 37 crore insurance crime news
प्रेमासाठी ‘तो' बनला़ बनावट जवान; आर्मी इंटेलिजेंसची कारवाई

पत्नीच्या मृत्यूचाही बनाव

प्रभाकर वाकचौरे याने पत्नीचा विमा उतरविलेला आहे. तिचा अपघाती मृत्यू झाल्याची बनावट कागदपत्रे विमा कंपनीकडे २०१७ मध्ये पाठविली होती. त्यावेळी विमा कंपनीने केलेल्या तपासणीत बनाव उघडकीस आला होता. त्यावेळी वैद्यकीय आणि पोलिस रेकॉर्ड अपघाताच्या घटनेला दुजोरा देणारे नसल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव करताना या त्रुटी दूर करून कट रचला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com