कर्जतकरांची ऐतिहासिक प्रतिक्षा संपली; वर्षातच डेपोसाठी पाच कोटी चार लाखाची तरतुद

निलेश दिवटे
Sunday, 29 November 2020

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्जत तालुक्याचा जिव्हाळ्याचा असलेला बस डेपोचा प्रश्न आता मार्गी लावण्यात राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना यश आले आहे.

कर्जत (अहमदनगर) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्जत तालुक्याचा जिव्हाळ्याचा असलेला बस डेपोचा प्रश्न आता मार्गी लावण्यात राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना यश आले आहे.

कर्जतकरांना दिलेल्या शब्दाची वर्षातच वचनपूर्ती करत या डेपोसाठी तब्बल ५ कोटी ४ लाख ३२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून कोरोनाच्या काळातही आपली पॉवर दाखवली आहे.या रकमेतुन  येथे आगार बांधणी व बस स्थानक परिसरात व्यापारी गाळे बांधण्यात येणार आहेत.याबाबत कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक प्रदेश नाशिक यांच्याकडून ई-निविदा मागवण्यात येत आहेत.

पंचवीस वर्षांच्या कालखंडात डेपोप्रश्नी अनेक आंदोलने,उपोषणे झाली मात्र वारंवार अश्वासनांवरच  तालुक्याला समाधान मानावे लागले.त्या मधील तत्कालीन मनसेचे जिल्हा प्रमुख सचीन पोटरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन विशेष गाजले.गुन्हे दाखल होत आंदोलकांना कारावास भोगावा लागला होता.

लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे क्षेत्रफळ असलेल्या कर्जत तालुक्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी,व्यावसायिक व नागरिकांची मोठी होरपळ होत होती.बस डेपोचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा या कर्जतकरांनी केलेल्या मागणीला प्राधान्य देत विधानसभेच्या निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द आ.रोहित पवारांनी खरा करून दाखवला आहे.कर्जतकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न गेली कित्त्येक वर्षे प्रलंबित असताना तो एकाच वर्षात मार्गी लागला आहे.

तत्कालीन मंत्री राम शिंदे यांनी आश्वासने दिली मात्र आश्वासनपूर्ती न झाल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.भर सभेत डेपोसाठी मंजुरी मिळाल्याचे आश्वासन देत प्रत्यक्षात डेपोचा प्रश्न 'जैसे थे' च्या अवस्थेत प्रलंबित राहिला. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत तर बाहेरच्या बस आणल्या आणि तीन दिवसांतच या सर्व बस पुन्हा माघारी गेल्याने बस डेपोचा स्टंट पुरता गाजला.मात्र मंत्री असताना जे राम शिंदे यांना जमले नाही ते आ. रोहित पवारांनी करून दाखवल्याने मतदारसंघात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

तालुक्याचे ठिकाण असल्याने दळणवळण होण्यासाठी बस डेपो अत्यंत महत्वाचा आहे.त्या मुळे  लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे क्षेत्रफळ असलेल्या कर्जत तालुक्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी,व्यावसायिक व नागरिकांची मोठी होरपळ होत होती.मात्र दिलेल्या आश्वासना नुसार शब्द खरा केला आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले.

येथे बस आगार नसल्याने इतर डेपो मधून येणाऱ्या वाहनांवर अवलंबून राहावे लागायचे.त्या मुळे विद्यार्थी विशेषत्वे विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागायचे मात्र आता येथे हक्काचे बस आगर झाल्याने सर्व सुरळीत होईल त्या बद्दल आ रोहित पवार आणि महाआघाडी सरकारचे मनःपूर्वक आभार.
- दादासाहेब थोरात, समाजीक कार्यकर्ते, कर्जत 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five crore four lakh sanctioned for construction of ST stand at Karjat