
एक हजार पर्यटकांचे ‘रेस्क्यू’
अकोले - कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे एक हजार पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांची राजूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी व जहागीरदार वाडीतील युवकांनी सुखरूप सुटका केली.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखराच्या परिसरात शनिवारी (ता. नऊ) सकाळपासून जोरदार वृष्टी सुरू होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने पाणी पायथ्याला उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने पूर आला होता. शनिवारी सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहणासाठी रवाना झाले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून पावसाने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे पर्यटक शिखरावरून खाली आले. नदीला पूर आल्याने बारी व जहागीरवाडी या ठिकाणी पोहचू शकत नव्हते. काही पर्यटकांनी पोलिस हेल्पलाईनशी संपर्कसाधून पुरात अडकल्याची माहिती दिली.
पर्यटक पुरात अडकल्याची माहिती राजूर पोलिस ठाण्याला प्राप्त होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलिस पथकासह घटनास्थळावर पोचले. तोपर्यंत जहागीरदार वाडीतील काही व्यावसायिक, गाईड व गावऱ्यांनी दोराच्या साहाय्याने नदीच्या पलीकडे अडकलेल्या पर्यटकांना स्वत: नदीवरील एका केटीवेअरच्या ठिकाणी पाण्यात उभे राहात साखळी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली.
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये राजूर सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस कर्मचारी अशोक गाढे, विजय फटांगरे व राकेश मुळाने यांनी सहभाग घेतला.
...अन् यश आले
पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरच होते. सायंकाळपर्यंत एक हजार पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात पोलिस व गावकऱ्यांना यश आले.
Web Title: Flood On Krishnavanti River Rescue Of A Thousand Tourists Akole Ahmednagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..