esakal | नगरमध्ये येणार पूर 

बोलून बातमी शोधा

bhingar nala in ahmednagar

नगर शहर दख्खणच्या पठारावरील एक शहर आहे. पठारावर असल्याने ओढे-नाले, जमिनीचा चढ-उतार हे शहराचे प्रकृतिक वैशिष्ट्य आहे. महापालिकेकडून शहरातील ओढे-नाले, गटारी यांची पावसाळ्यापूर्वी सफाई होत नाही. त्यामुळे शहरात दर पावसाळ्यात पूर स्थिती येते. यंदाही हीच स्थिती पुन्हा शहरात निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

नगरमध्ये येणार पूर 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर - नगर शहर दख्खणच्या पठारावरील एक शहर आहे. पठारावर असल्याने ओढे-नाले, जमिनीचा चढ-उतार हे शहराचे प्रकृतिक वैशिष्ट्य आहे. महापालिकेकडून शहरातील ओढे-नाले, गटारी यांची पावसाळ्यापूर्वी सफाई होत नाही. त्यामुळे शहरात दर पावसाळ्यात पूर स्थिती येते. यंदाही हीच स्थिती पुन्हा शहरात निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

या बाबत नगरसेवक गणेश भोसले यांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली होती. तरीही वेळेवर नाले-सफाईचे काम झाले नसल्याचा आरोप नगरसेवक गणेश भोसले यांनी केला आहे. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईचे काम मे महिन्या अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. महापालिकेने या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने हे काम काही दिवस बंद ठेवल्याचेही समजते.

शहरात 21 ओढे-नाले आहेत. या शिवाय शहराअंतर्गत गटारीही आहेत. या गटारींची सफाई होणे आवश्‍यक आहे. पावसाळा सुरू झाला आहे. ही सफाई वेळेत न झाल्याने शहरात पूर स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. पूर स्थिती निर्माण झाल्यास त्यास महापालिका व संबंधित ठेकेदार जबाबदार राहील, असे नगरसेवक गणेश भोसले यांनी महापालिका प्रशासनाला कळविले आहे. 

नगर शहरातील उपनगरांतील काही ओढ्या-नाल्यांतील झाडे-झुडपे, गाळ काढण्याचे काम महापालिकेने केले आहे. शहरातील ओढ्या-नाल्यांत कचरा टाकणे, भराव टाकणे असे प्रकारही झाले आहेत. त्यामुळे ओढ्या-नाल्यांचा मूळ प्रवाह बदलला गेला आहे. त्यामुळे शहरातील पूर स्थिती निर्माण होते. शहरातील रस्त्यांच्याकडेला असलेल्या गटारी कित्तेक वर्षांपासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पाऊस आल्यास पावसाचे पाणी उताराने वाहू लागते. काही ठराविक ठिकाणी हे पाणी साचते. त्यामुळे या भागात पूर निर्माण होतो. शहरातील भिंगारनाला, सीना नदी यांना जोडणारे ओढे-नाले अजूनही साफ झालेले नाहीत. 

मान्सून केरळात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात व नगर शहरात मान्सूनपूर्वने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. पहिल्याच मोठ्या पावसात महापालिकेच्या नालेसफाई कामाची पोलखोल होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षीही पहिल्याच पावसात शहरातील काही भागांत पूर स्थिती निर्माण झाली होती. त्याच स्थितीची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे नगरसेवक भोसले यांनी महापालिका प्रशासनाला कळविले आहे.