संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतमालांवर चोरांनी वळविला मोर्चा

शांताराम जाधव 
Thursday, 19 November 2020

शेतीमालाच्या बाजारभावातील चढउतार, निसर्गाची साथ नाही, त्यात कोरोनाचे संकट या सगळ्या आपत्ती असतानाही त्यात मोठा खर्च करून हाता तोंडाशी आलेला घास एका रात्रीत चोरट्यांनी हिरावून नेल्याने दोन्ही शेतकरी निराश झाले आहेत.

बोटा (अहमदनगर) : दिवाळीच्या काळात दुकानफोडी व वाहने चोरीचे प्रकरणे वाढत चाललेली असताना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतमालांवरही आता चोरांनी मोर्चा वळविला आहे. दोन शेतातील विक्रीस आलेला फ्लॉवर चोरून गेल्याची घटना शनिवारी मध्य रात्रीच्या दरम्यान घारगाव शिवारात घडली. 

संदीप शंकर आहेर यांनी घारगाव शिवारातील गणेशवाडीत २० गुंठे क्षेत्रात फ्लॉवरचे पिक घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच एक तोडणी झाली होती. दुसऱ्यांदा विक्रीसाठी शेतातील फ्लॉवर तोडून घ्यावा. या विचाराने आहेर सकाळी शेतात गेले असता शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी तोडणीस आलेले फ्लॉवर हाताने तोडून नेल्याचे निदर्शनास आले. शेतातील दृश्य पाहून आहेर यांनी कपाळाला हात लावला.आहेर यांच्या शेतात फक्त फ्लॉवरचे झाडे शेतात दिसत होते. त्याचबरोबर संदीप आहेर यांच्या शेजारीच असणार्‍या अनिल नाईकवाडी यांच्याही शेतातील फ्लॉवरवरही सुद्धा चोरांनी डल्ला मारला.

शेतीमालाच्या बाजारभावातील चढउतार, निसर्गाची साथ नाही, त्यात कोरोनाचे संकट या सगळ्या आपत्ती असतानाही त्यात मोठा खर्च करून हाता तोंडाशी आलेला घास एका रात्रीत चोरट्यांनी हिरावून नेल्याने दोन्ही शेतकरी निराश झाले आहेत. या प्रकरणी आहेर व नाईकवडी यांनी घारगांव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers have been stolen from a plateau in Sangamner taluka