कुठल्याच पदावर नसलेल्या तिघांच्या तडजोडीने वाळू चोरांचा धुमाकूळ 

सचिन सातपुते
Sunday, 29 November 2020

एका वरिष्ठ अधिका-याचे नातलग सर्रास मलीदा गोळा करत असल्याने कुठल्याच पदावर नसलेल्या तीन व्यक्तींच्या तडजोडींनी तालुक्यात धुमाकुळ घातला आहे.

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्यातील अवैध आळू उपसा, गौण खनिज उत्खनन करणा-या व्यक्तींकडून तालुका प्रशासनातील एका वरिष्ठ अधिका-याचे नातलग सर्रास मलीदा गोळा करत असल्याने कुठल्याच पदावर नसलेल्या तीन व्यक्तींच्या तडजोडींनी तालुक्यात धुमाकुळ घातला आहे. महसुल प्रशासनात व अवैध व्यावसायिकात या तीन नातलाग हस्तींची चर्चा जोरात सुरु आहे. 

तालुक्यात गोदावरी नदीसह ढोरा, नंदीनी, काशी, रेडी यासह सर्व ओढया नाल्यांची वाळू सध्या सोन्याच्या भावात विकत आहे. अनेक दिवसापासून लिलाव झालेले नसल्याने अवैधरित्या सुरु असलेला वाळू उपसा अनेकांसाठी रोजगाराचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे कोणीही अधिकारी तालुक्यात आला काहीही कारवाई केली. तरीही वाळू उपसा, मुरुम व मातीचे उत्खनन थांबवू शकलेले नाहीत. त्यामुळे महसुल व पोलीस प्रशासनातील अधिकारी अशा अवैध व्यावसायिकांशी कारवाईच्या आडून तडजोडी करुन स्वत:चे उखळ पांढरे करण्यात धन्यता मानतात. अनेकदा कारवाईचा मोठा फार्स करुन पकडलेली वाहने रात्रीतुन परस्पर सोडून दिली जातात. अधिकारी या कामासाठी आपल्या खास कर्मचा-याची नियुक्ती करुन आपले काम सोपे करतात. 

सध्या पावसाळ्या नंतर नदी ओढे यातील पाणी कमी झाल्यानंतर व बांधकामे जोमाने सुरु झाल्यानंतर अवैध वाळू तस्करीने डोके वर काढले आहे. महसुल व पोलीस प्रशासनाने आपआपल्या परीने कारवाईचे सोपस्कर सुरु केले असले तरी त्यामागील गोडबंगाल मात्र दोन तीन नातेवाईक व्यक्तींच्या तडजोडीमुळे वाढत चालले आहे.

तालुका प्रशासनातील एका वरीष्ठ अधिका-याचे जवळचे नातलग असलेल्या तिघाजणांचा तालुक्यात अवैध व्यावसायिकांमध्ये वावर वाढला आहे. कुठल्याही पदावर नसलेल्या या तिघांनी वाळू, मुरुम, खडी, डबर, माती उपसा करणा-या अवैध टोळयांशी संधान बांधून मलीदा गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे सर्वच अवैध व्यावसायिकांना यामाध्यमातून तडजोडीसाठी एक शिडी उपलब्ध झाली असून त्यांच्या सोबतच्या पार्ट्या, जेवणावळी, वाढदिवस डामडौलात साजरे होवू लागले आहेत. 

या जवळच्या नातलगांची चर्चा महसुल विभागातील कर्मचारी, अवैध व्यावसायिक व नागरीकांमध्ये दबक्या आवाजात रंगली आहे. वरीष्ठ अधिका-यांनी या अनधिकृत व्यक्तींचा व त्या आडून पदाचा गैरवापर करणा-या अधिका-यांचा शोध घेवून त्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A flurry of sand thieves with the compromise of three who are not in any position