बापूंच्या मार्गाने चला, सगळं नीट होईन; मंत्री थोरातांच्या नागवडेंना कानपिचक्या

संजय आ. काटे
Saturday, 19 September 2020

बापूंनी घालून दिलेला आदर्श कायम जपणार आहे. शिक्षणसंस्था, कारखाना यातून सभासदांचे हित जपताना, उसाला जिल्ह्याच्या बरोबरीने दर देऊ. मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरूच ठेवणार आहोत.

श्रीगोंदे : ""ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी कायम सामान्यांशी नाळ ठेवत तालुक्‍याचा विकास साधला. आजही राज्यात सहकार चळवळीत त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांचे हेच संस्कार पुढच्या पिढीकडून अभिप्रेत आहेत. त्यांनी दिलेली शिस्त व शिकवणीच्या मार्गाने गेलात, तर यश आपोआप मिळेल,'' असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केले. 

ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात नागवडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण, कोविड सेंटर, तसेच ग्रामीण रुग्णालयात सेंटर ऑक्‍सिजन सिस्टिमचे उद्‌घाटन मंत्री थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे होते. आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा नागवडे, घनश्‍याम शेलार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, दत्तात्रेय पानसरे, शुभांगी पोटे, बाळासाहेब नाहाटा, केशव मगर, प्राचार्य एकनाथ खांदवे आदी उपस्थित होते. 

मंत्री थोरात म्हणाले, ""बापूंनी आयुष्यभर निष्ठा, तत्व आणि समाज हिताला प्राधान्य दिले. त्यांची चिकाटी व जिद्द आजही श्रीगोंद्याच्या विकासात ठळक दिसते. सहकारी साखर कारखानदारी कशी चालवावी, हे त्यांनी राज्याला दाखवून दिले. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी स्थापन केलेले जिव्हाळ्याचे संबंध तालुक्‍यात विकासगंगा आणण्यासाठी उपयोगी ठरले. त्यामुळेच त्यांना राज्यातील सहकारात अढळ स्थान आहे.'' 

राजेंद्र नागवडे म्हणाले, ""बापूंनी घालून दिलेला आदर्श कायम जपणार आहे. शिक्षणसंस्था, कारखाना यातून सभासदांचे हित जपताना, उसाला जिल्ह्याच्या बरोबरीने दर देऊ. मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरूच ठेवणार आहोत.''

प्रास्ताविक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी केले. प्रा. धर्मनाथ काकडे यांनी आभार मानले. 
 

कुणाला वाटले होते, मंत्री होईल म्हणून..? 
विधानसभा निवडणूक काळात तालुक्‍यातील कॉंग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल मंत्री थोरात यांनी चांगलेच चिमटे काढले. ते म्हणाले, ""गडबड होत असते; मात्र, वडिलधाऱ्यांचे संस्कार सोडायचे नसतात. हीच वेळ असते, परीक्षा देण्याची; परंतु त्यात चलबिचल झाली की अडचण होते. आम्हालाही चढउतार आले, येतात; मात्र आम्ही ठाम राहतो. कुणाला वाटले होते मंत्री, महसूलमंत्री होईन; पण आज मंत्री म्हणूनच येथे आहे.'' 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Follow Bapu's path, everything will be fine