राळेगणसिद्धीपाठोपाठ पानोली, कारेगावचंही ठरलं

मार्तंड बुचुडे
Sunday, 20 December 2020

आमदार लंके यांच्या आवाहनाला तालुक्‍यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनीसुद्धा ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे समर्थन केले आहे. 

पारनेर : तालुक्‍यात आमदार नीलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अन 25 लाख विकासनिधी मिळवा, याला प्रतिसाद मिळत आहे. राळेगणसिद्धी पाठोपाठ पानोली, कारेगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय आमदार लंके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. 

आमदार लंके यांच्या आवाहनाला तालुक्‍यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनीसुद्धा ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे समर्थन केले आहे. 

लंके यांनी दोन दिवसांपूर्वी सुपे जिल्हा परिषद गटातील गावांच्या बैठका घेतल्या. अनेकांशी संवाद साधत निवडणुका बिनविरोध करण्याची संकल्पना मांडली. तिचा अनेकांनी स्वीकार करण्याचे आश्‍वासन दिले.

आज (रविवारी) लंके यांच्या उपस्थितीत पानोली व कारेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. काल टाकळी ढोकेश्वर गटातील गावांच्या बैठका घेतल्या आहेत. ते तालुक्‍यातील पाचही गटांत बैठका घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Following Ralegan Siddhi, Panoli and Karegaon were also settled