काय खाऊ? कंदमुळं खावीत तर तीही रानडुकरांनी फस्त केलीत, आदिवासींचे गाऱ्हाणे

शांताराम काळे
Tuesday, 27 October 2020

जंगलातील कंदमुळे खावीत, तर तीही रानडुकरांनी फस्त केली. आम्ही कसेही जगू; पण पोराबाळांचे काय,' अशा शब्दांत पेठेवाडी येथील ग्रामस्थांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्यासमोर व्यथा मांडली.

अकोले : "सायब, आम्ही गरिबांनी काय करावे, कसे जगावे? अगोदरच कोरोना, त्यात अस्मानी संकट. रोजगार नाही. हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून नेला. हातात पैका नाही. रेशनचे दाणे संपून चार महिने झाले.

जंगलातील कंदमुळे खावीत, तर तीही रानडुकरांनी फस्त केली. आम्ही कसेही जगू; पण पोराबाळांचे काय,' अशा शब्दांत पेठेवाडी येथील ग्रामस्थांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्यासमोर व्यथा मांडली. त्यामुळे व्यथित झालेल्या पिचड यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून, प्रश्न सोडवा, नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. 

कोरोना महामारीने गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्‍यातील ठिकठिकाणच्या ग्रामस्थांना त्रस्त केले आहे. रोजगार नाही, भातपीक नष्ट झाले. त्यातच तीन महिन्यांपासून स्वस्त धान्य मिळत नाही.

तालुका प्रशासन लक्ष देत नसल्याने पेठेवाडी ग्रामस्थांनी 25 किलोमीटर पायपीट करीत राजूरला येऊन पिचड यांची भेट घेतली. समस्या मांडल्या. जी अवस्था पेठेवाडीची, तीच कुमशेत, पाचनई, भोजदरी, ठाकरवाडीची. स्वस्त धान्य दुकानदार धान्य देत नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. मुलाबाळांसह उद्या (बुधवारी) सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालयात ठिय्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food grains are not distributed to the tribals