महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी : कर्डिले

विलास कुलकर्णी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेत. दुधाचे दर १८ रुपये लिटरवर घसरलेत. बियाणे कंपन्यांनी फसवणूक केली. खतासाठी रांग लावावी लागते. शेतकर्‍यांची हेळसांड सुरू आहे.

राहुरी (अहमदनगर) : महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेत. दुधाचे दर १८ रुपये लिटरवर घसरलेत. बियाणे कंपन्यांनी फसवणूक केली. खतासाठी रांग लावावी लागते. शेतकर्‍यांची हेळसांड सुरू आहे. दूध भुकटी निर्यातीला प्रति किलो ५० रुपये व दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर १० रुपये अनुदान मिळाले नाही. तर, तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला.

शनिवारी (ता. १) भाजपा महायुतीतर्फे राहुरी येथे बाजार समिती समोर दूध बंद महाएल्गार प्रसंगी कर्डिले बोलत होते. रासपाचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, रवींद्र म्हसे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश पवार, रिपाईचे अरुण साळवे, सुवर्णा जऱ्हाड, रेखा नरवडे, बबन कोळसे, संदीप गीते, शहाजी ठाकूर, योगेश देशमुख, गणेश खैरे, ज्ञानदेव क्षीररसागर, सुरसिंग पवार, उत्तम म्हसे, उत्तम आढाव उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, दूध दरवाढीसाठी आठ दिवसापूर्वी निवेदन दिले. परंतु, सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागले. भाजपा सरकारने दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान दिले. भाजपच्या काळात खतासाठी शेतकऱ्यांना रांग लावावी लागली नाही. कोरोना संकटात शेतकरी, व्यापारी, सामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरले आहे. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. तर, राज्यभर तीव्र आंदोलने छेडली जातील. त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असेही कर्डिले यांनी ठणकावले.

नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Kardile alleges that Mahavikas Aghadi government is anti farmer