मी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही

शांताराम काळे
Friday, 7 August 2020

शासन काय करत नाही, तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा. सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे आक्रमक होत माजी आमदार वैभव पिचड यांनी इशारा दिला आहे.

अकोले (अहमदनगर) : शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाले आहे. हाताला काम नाही, खायला घास नाही. सोने गहाण ठेवून उसने पासने करून बियाणे खते आणले तेही वायाला गेले. शासन काय करत नाही, तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा. सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे आक्रमक होत माजी आमदार वैभव पिचड यांनी इशारा दिला आहे.

तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी कार्यालयात चाळीस गाव डांगचा व पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषेदचे सरपंचाचे व शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत तुम्ही कुठपर्यंत कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार आहेत, असा सवाल पिचड यांनी करून सात दिवसाचा अल्टिमेट देत मी पुन्हा येईल सांगत आक्रमक होताना दिसले. राजूर येथे सरपंच परिषद व शेतकऱ्यांनी एकत्र येत पिकांचे झालेले नुकसान, खते, बियाणे, रोजगार अकोले तालुक्यात अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मुख्य उपस्थितीत ग्रामीण भागातील सर्व सरपंचासोबत अकोले येथील तहसिलदारांना दुष्काळासंदर्भात जाब विचारण्यात आला.

अकोले तालुक्यातील शेतकरी पावसाअभावी अडचणीत आला असेल तर अधिकारी पंचनामे का करत नाहीत? अधिकारी कुठे गेले? लोकप्रतिनिधी कुठे आहेत? तसेच तहसिलदारांना निवेदन देण्यात आले व पुढील सात आठ दिवसात जर भातशेतीचे पंचनामे झाले नाही तर अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही वैभव पिचड यांनी ठनकाऊन सांगितले. समवेत सर्व सरपंच  तसेच सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, बीजेपी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, यशवंत अभाळे, भरत घाणे, गणपतराव देशमुख, चंद्रकांत गोंदके, पांडुरंग खाडे, विजय भांगरे, सयाजी अस्वले, संपत झडे, सूदंम भांगरे तसेच अनेक शेतकरी देखील उपस्थित होते.

तालुक्यात पाच महिने पूर्ण झाले तरी रोजगार हमीचे कामे सुरु नाहीत, खावटी नाही, त्यामुळे शेतकरी संकटात आहे. कोरोनाचे संकट त्यात वरून राजाची साथ नाही, रोपे सडून जात आहे काही शेतकरी पेरणीच्या साठी आभाळाकडे डोळे लावून पाहत आहे. सरकार व प्रशासन याबाबीकडे डोळेझाक करीत असेल तर न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असेही पिचड म्हणाले.

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Vaibhav Pichad is working to give justice to the common farmer