अकोले संगमनेर रस्त्याचे खड्डे तात्काळ भरण्यासाठी माजी आ. वैभवराव पिचड यांचा कार्यकारी अभियंताच्या दालनात ठिय्या !

शांताराम काळे 
Thursday, 12 November 2020

अकोले- संगमनेर रस्त्यावरील खड्डे डांबराने तात्काळ बुजवावे, या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांच्या दालनात ठिय्या दिला असता तात्काळ खड्डे बुजवण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले.

अकोले (नगर) : तालुक्यातील जनता एक कोरोनाने तर दुसरे अकोले-संगमनेर रस्त्याच्या दुर्दशेने हैराण झाले असून दिपावली सणासुदीच्या काळात लोकांची संगमनेर-अकोले रस्त्यावर जास्त वर्दळ असते. त्यामुळे अकोले- संगमनेर रस्त्यावरील खड्डे डांबराने तात्काळ बुजवावे, या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांच्या दालनात ठिय्या दिला असता तात्काळ खड्डे बुजवण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले.

अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी राजमार्ग प्रश्नासंदर्भात माजी आ.वैभवराव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संगमनेर यांच्या दालनात भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोलेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक परशराम शेळके, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचाैरे, चंद्रकांत घुले, शंभू नेहे, राहुल देशमुख, विजय पवार, हितेश कुंभार, ज्ञानदेव निसाळ, मोईन शेख आदी उपस्थित होते.

यावेळी चर्चा करताना माजी आ. पिचड आक्रमक होऊन म्हणाले, हायब्रेड युनिटी अंतर्गत कोल्हार घोटीवरील संगमनेर बारी रस्त्याच्या सुरु असलेल्या कामाचा ठेका देताना रहदारीसाठी रस्ता उपलब्ध करुन देण्याचे ठरलेले असताना सदर ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. रस्त्याच्या कडेची झाडाची कत्तल करण्याची जेवढी घाई या ठेकेदार व प्रशासनाने केली, तेवढी घाई विद्युत पोल शिफ्टींग व इतर कामात करत नाही. या रस्त्याच्या कामामुळे व रस्त्यावरील वळणे सरळ न केल्याने झालेली व होणारे अपघातांचा क्लेम सार्वजनिक बांधकाम विभागावर करायचा का असा प्रश्न केला. 

सद्या दिपावली सण उत्सवाचा काळ जवळ आहे. अकोले-संगमनेर भागात लोकांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु आहे. खरेदी तसेच सणाला घरी येणारे-जाणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. माञ या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यात मोठ मोठी खड्डे पडलेली आहे. अनेकाच्या दुचाकी खड्ड्यात आदळून अथवा सरकून अपघातही झालेले आहे. रस्त्यावर निकृष्ट दर्जाचा मुरुम व माती टाकल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचा फुपाटा होतो. सदर ठेकेदार व सार्वजनिक विभाग जनतेच्या जिवाशी खेळत आहे. 

तेव्हा तात्काळ अकोले-संगमनेर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व या रस्त्यावरील विद्युत पोलचे शिफ्ट करावे, अशी मागणी केली. यावेळी सार्वजनिक बाधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांनी अकोले- संगमनेर रस्त्यावरील खड्डे उद्यापासून बुजवण्याचे काम सुरु होईल, असे आश्वासन देत संबंधित ठेकेदाराला फोनवर तश्या सूचनाही केल्या. 
       
सरकारच्या दोन्ही विभागातील वादात तालुक्यातील जनता भरडली जात आहे. कोल्हार घोटी रस्त्याच्या कामात ३२ गाव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन उध्वस्त झाली आहे. यामुळे रस्त्याचे कामही थांबले व पाणी पुरवठा योजनेचे कामही थांबले आहे. आता ही पाईप लाईन दुरूस्त कोण करणार यावर सार्वजनिक बांधकाम व जिवण प्राधिकरण या विभागात वाद आहे. त्यामुळे शासनाच्या या दोन विभागाच्या वादात जनतेला पाणी नाही व रस्ताही होत नाही, अशी दुहेरी फरपट होत असल्याची प्रतिक्रिया माजी आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Vaibhavrao Pichad went to the office of the Executive Engineer to fill the potholes of Akole Sangamner Road immediately the Executive Engineer promised to fill the potholes immediately