नगर-मनमाड राज्यमार्गावरील रस्ता मजबूत व्हावा : माजी खासदार प्रसाद तनपुरे

विलास कुलकर्णी
Wednesday, 23 September 2020

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे रस्ता हस्तांतरित करून, सिमेंट कॉंक्रीटचा मजबूत रस्ता व्हावा. अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली.

राहुरी (नगर) : नगर-मनमाड राज्यमार्ग क्र.४९ केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० म्हणून घोषित केला आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा सर्वात जवळचा रस्ता आहे. त्यामुळे, या रस्त्यावरून अवजड वाहनांसह प्रचंड वाहतूक आहे. वीस वर्षापूर्वी चौपदरीकरण केलेल्या डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे रस्ता हस्तांतरित करून, सिमेंट कॉंक्रीटचा मजबूत रस्ता व्हावा. अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली.

तनपुरे म्हणाले, केंद्र सरकारने नगर-मनमाड राज्यमार्ग २२ मार्च २०१३ रोजीच्या राजपत्रात राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. त्यानंतर त्यात थोडासा  बदल करुन, ०३ जानेवारी २०१७ रोजीच्या राजपत्रात सिन्नर, सावळीविहीर फाटा, शिर्डी, राहुरी, नगर, दौंड, फलटण, मिरज ते चिकोडी (कर्नाटक) असा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. परंतु, अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करून घेतला नाही.
 
केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला सुरत-हैदराबाद ग्रीनफील्ड रस्ता नगर-मनमाड रस्त्याला पर्याय ठरु शकत नाही. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा सर्वात जवळचा नगर-मनमाड रस्ता आहे. त्यामुळे, या रस्त्यावरून अवजड वाहनांसह प्रचंड वाहतूक आहे. राज्य सरकारने सन २००० मध्ये नगर-मनमाड रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम केले. त्यावेळी रस्त्यावरून २० टन क्षमतेची वाहने धावत होती. त्यानुसार रस्त्याचे काम झाले. वीस वर्षात यांत्रिकीकरणात आमुलाग्र बदल झाला. आता शंभर टन क्षमतेची वाहने रस्त्यावरून धावत आहेत. त्यामुळे डांबरी पृष्ठभाग खचून रस्ता फुटत आहे. या रस्त्यावर रोज ३४ हजार लहान-मोठी वाहने धावतात. 
      
या रस्त्यावर शिर्डी व शनी शिंगणापूर ही जागतिक कीर्तीचे देवस्थाने आहेत. तेथे येणाऱ्या भाविकांसह शिर्डी विमानतळ, कृषी विद्यापीठ, आठ रेल्वे स्थानके, अकरा साखर कारखाने, बाजार समित्या, सहकारी संस्था या वाहतुकीच्या रस्त्यावर आहे. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने धावतात. रस्ता फुटलेला असल्याने, खड्ड्यांमध्ये वाहने आदळून दररोज अपघात घडत आहेत. रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी नवीन भूसंपादनाची गरज नाही, असेही तनपुरे यांनी पत्रात म्हंटले आहे.

संपादन :  सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MP Prasad Tanpure has demanded that the road on Nagar Manmad state highway be strengthened