
शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत राहुरी पोलिसांनी मुलीची कसून शोध मोहीम घेतली. परंतु यश आले नाही.
राहुरी (अहमदनगर) : ब्राह्मणी येथे शुक्रवारी रात्रीपासून ऊस तोडणी कामगाराची साडेचार वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वांबोरी येथील प्रसाद शुगर ॲण्ड अलाईड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. या साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांचा ऊस तोडणीकरिता आलेल्या ऊस तोडणी मजुरांचा ब्राह्मणी येथे अड्डा आहे. तेथून शुक्रवारी (ता. १२) मध्यरात्री राहत्या कोपीतून साडेचार वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलीच्या कुटुंबाने शनिवारी दिवसभर शोध घेऊन, मुलगी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी शनिवारी रात्री राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. शरद गजानन मोरे (वय ३५, रा. लोहगाव, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून, अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत राहुरी पोलिसांनी मुलीची कसून शोध मोहीम घेतली. परंतु यश आले नाही. रविवारी सकाळपासून पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्यासह राहुरी पोलिस ठाण्याचे आठ पोलिस, दंगल नियंत्रक पथकाचे २० पोलिस कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. नगरवरुन श्वानपथक बोलाविण्यात आले. परंतु रविवारी सायंकाळपर्यंत मुलीचा शोध लागला नाही. ब्राह्मणी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
मजुरांच्या अड्डयासमोर शेतात ऊस उभा आहे. उसात बिबट्याचा वावर असतो. त्यादृष्टीने सुद्धा तपास केला जात आहे. मुलीच्या आई-वडिलांना अपहरण झाल्याचा संशय असल्याने, पोलिसांचा फौजफाटा वेगाने तपास करीत आहे. वांबोरी पोलिस दूर क्षेत्राचे पोलिस कर्मचारी शनिवारी रात्रीपासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत.