नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने चौघांना अटक

सचिन सातपुते
Monday, 21 December 2020

सासरच्या व्यक्तींनी शारीरिक व मानसिक छळ करून नवविवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिचा पती, दिर, सासू, सासरा अशा चौघांवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगाव (अहमदनगर) : सासरच्या व्यक्तींनी शारीरिक व मानसिक छळ करून नवविवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिचा पती, दिर, सासू, सासरा अशा चौघांवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

मृत विवाहीतेचे वडील बाळासाहेब रघुनाथ भावले (रा. करंजी, ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृतेचा पती राहुल विश्वास गाडे, दिर सुरज विश्वास गाडे, सासरा विश्वास गोधाजी गाडे व सासू सुनिता विश्वास गाडे (सर्व रा. प्रभाकरनगर, शेवगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी स्वाती हीचे लग्न राहुल गाडे याच्याशी (ता. 30 जून 2020) रोजी झाले. तेव्हा पासून (ता. 16 डिसेंबर 2020) पर्यंत तिला लग्नात संसारोपयोगी साहित्य न दिल्याचे कारण सांगून नवरा, दीर, सासु, सासरा मारहान करीत होते. 

माहेरहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी वेळोवेळी तीचा छळ करीत होते. दीर सुरज यानेही दमबाजी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सर्वांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे करीत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four arrested for inciting newlywed to commit suicide