चार महिन्यांचे बिल थकल्याने कोरोनाबाधित रुग्णांना मिळेना चहा

विलास कुलकर्णी
Wednesday, 9 September 2020

राहुरी फॅक्‍टरी येथे श्री विवेकानंद नर्सिंग होममध्ये महिनाभरापासून शासनातर्फे सुरू असलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजनची सेंटर लाइन नाही.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी फॅक्‍टरी येथे श्री विवेकानंद नर्सिंग होममध्ये महिनाभरापासून शासनातर्फे सुरू असलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजनची सेंटर लाइन नाही. मर्यादित एक्‍स-रे, अवेळी नाष्टा, जेवण मिळते. यातच चार महिन्यांचे बिल थकल्याने आज चहाही बंद झाला. दिवसभर डॉक्‍टरही नसतात. यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची जीवनरेषा नर्सच्या भरवशावरच सुरू असून, कोरोनाग्रस्त रुग्णांची हेळसांड सुरू आहे.

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात तीन महिन्यांपूर्वी 600 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू झाले. गेल्या महिन्यात राहुरी फॅक्‍टरी येथे 50 खाटांचे कोविड हेल्थ सेंटर सुरू झाले. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्रास वाढल्यास त्यांना उपचारांसाठी राहुरी फॅक्‍टरीतील हेल्थ सेंटरमध्ये हलविले जाते. तेथे सध्या 21 रुग्ण उपचार घेत आहेत. हेल्थ सेंटरला मान्यता देताना आवश्‍यक निकष पूर्ण केले नाहीत. आयसीयू आहे मात्र सुविधा नाहीत.

ऑक्‍सिजन सिलिंडर आहेत; पण ऑक्‍सिजनची सेंटर लाइन नाही. एक्‍स-रे सुविधा दोन दिवसांपूर्वी सुरू झाली. तिलाही मर्यादा आहेत. खोकला, श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांचे रोज एक्‍स-रे काढले जाणे अपेक्षित आहे; परंतु अवघ्या दोन-तीन जणांचे एक्‍स-रे काढले जातात. जेवणाचा ठेकेदार अगोदर विद्यापीठ, नंतर राहुरी फॅक्‍टरी येथे डबे पोहोचवितो. त्यामुळे सकाळचा नाश्‍ता अकराला, दुपारचे जेवण अडीच-तीनला मिळते. तोपर्यंत वृद्ध रुग्णांचा जीव भुकेने व्याकूळ होतो. सकाळी नऊला मिळणारा कपभर चहाही चार महिन्यांचे बिल थकल्याने आज बंद झाला.

नाव न सांगण्याच्या अटीवर एक रुग्ण म्हणाला कोरोनाबाधित निघाल्यावर राहुरी फॅक्‍टरी येथील "डीसीएचसी'मध्ये ऍडमिट आहे. खोकला बंद होत नाही. शुगर असल्याने, चार दिवसांपूर्वी तपासणीची मागणी केली. आज पाचव्या दिवशी शुगरची तपासणी झाली. चार दिवसांत दोनच डॉक्‍टर पाहिले. तेही 15 मिनिटांत राउंड संपवून दिवसभर गायब झाले. एका नर्सच्या भरवशावर कोरोनाग्रस्त उपचार घेत आहेत.

 

राहुरी फॅक्‍टरी येथील हेल्थ सेंटरमधील आयसीयूमध्ये सुविधा नाहीत. इतर त्रुटी दूर केल्या जातील. एका डॉक्‍टरला आठ तासांची एक पाळी, अशी दिवसभरात तीन डॉक्‍टरांची नियुक्ती केली आहे. डॉक्‍टर थांबत नसतील, तर त्यांना नोटीस बजावू. बैठकीत हेल्थ सेंटरचा आढावा घेऊ.

- डॉ. नलिनी विखे, तालुका आरोग्याधिकारी, राहुरी

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four month bill pending corona patients do not get tea