
सामूहिक अत्याचार प्रकरणी चार जणांना २० वर्षे सक्तमजुरी
श्रीगोंदे - रस्त्याने जाणाऱ्या महिलेला अडवून सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघांना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा श्रीगोंदे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी ठोठावली. अमोल ताराचंद ऊर्फ खादवड्या पवार (वय ४२, रा. बारडगाव सुद्रिक), रज्जाक चिवल्या काळे (वय ४२, रा. येसवडी), सागर गोट्या ऊर्फ बंडू काळे (वय २९, रा. राक्षसवाडी), चक्क्या ऊर्फ लंकेश विवल्या काळे (वय ३२, राशीन, ता. कर्जत) अशी शिक्षा ठोठावलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील संगीता ढगे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
एक विवाहिता पाच मार्च २०२० रोजी सकाळी साडेदहा वाजता कर्जत तालुक्यातून बेलवंडी (ता. श्रीगोंदे) येथे येण्यासाठी निघाली होती. विवाहितेवर चौघांनी निर्जनस्थळी सामूहिक अत्याचार केला. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले होते. या अत्याचारानंतर तिला गंभीर जखमी केले होते. या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींना सामूहिक अत्याचाराबद्दल दोषी धरण्यात आले. प्रत्येकी वीस वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, रस्तालुटीबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली. पीडितेस दंडाच्या रकमेतून नुकसान भरपाई म्हणून रुपये वीस हजार रुपये देण्याचा आदेश केला. पैरवी अधिकारी म्हणून गणेश ठोंबरे, सुजाता गायकवाड यांनी काम पाहिले.
दोन वर्षांच्या आत शिक्षा
या खटल्यात सरकारतर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील संगीता ढगे यांनी याबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे न्यायनिवाडे सादर करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला. दोन वर्षांच्या आतमध्ये या खटल्याचा निकाल लागला.
Web Title: Four People Sentenced 20 Years Hard Labor Mass Atrocity Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..