हव्यास अती, तेथे फसण्याची भीती; व्यापारी, उद्योजकांना पाच कोटींचा गंडा घालून आरोपी परागंदा

सूर्यकांत वरकड
Wednesday, 21 October 2020

अहमदनगर शहरातील एका प्रथितयश व्यापाऱ्याचे नाव सांगून एकाने शहरातील अनेक व्यापारी, उद्योजकांना सुमारे पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

नगर : अहमदनगर शहरातील एका प्रथितयश व्यापाऱ्याचे नाव सांगून एकाने शहरातील अनेक व्यापारी, उद्योजकांना सुमारे पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सध्या हा आरोपी परागंदा झाला आहे. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या व्यापाऱ्यांवर डोक्‍याला हात लावण्याची वेळ आली आहे. या व्यवहाराचा कोणताही पुरावा नसल्याने सर्वच हतबल झाले आहेत. 

आता लॉकडाउन शिथिल होत असल्याने उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे शहरातील व्यापारी वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील डाळ मंडई येथे मैदा, बेसन, यांसह विविध किराणा मालाच्या खरेदीसाठी एक जण व्यापाऱ्यांकडून पैसे घेत होता. या घेतलेल्या पैशांवर टक्केवारीनुसार महिन्याला व्याज देत असे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा त्याच्यावर चांगला विश्‍वास बसला. घरबसल्या जास्तीचे पैसे मिळत असल्याने, अनेक जण त्याच्याकडे गुंतवूणक करू लागले. ही गुंतवणूक तो डाळ मंडईतील एका व्यापाऱ्याच्या नावाखाली करीत होता. 

शहरातील अनेक उद्योजक व व्यापाऱ्यांकडून त्याने पैसे घेतले. सुरवातीला त्यांना टक्केवारीनुसार परत केले. मात्र, हा सर्व व्यवहार वरवर होत होता. त्याचा कुठलाही पुरावा नव्हता. शहरातील सुमारे 20 ते 25 व्यापाऱ्यांकडून तब्बल पाच कोटी रुपये घेऊन 15 दिवसांपूर्वी आरोपी परागंदा झाला. व्यापारी त्याचा शोध घेत असले, तरी कोणताही पुरावा मागे नसल्याने सारेच हतबल झाले आहेत.

लॉकडाऊनमध्ये जपून ठेवलेला पैसा जास्तीच्या हव्यासापोटी गेल्याने व्यापारी हताश झाले. काहींनी संबंधित प्रथितयश व्यापाऱ्याकडे पैशासाठी तगादा लावला आहे. याबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवलेली नव्हती. डाळ मंडईतील प्रथितयश व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, चायनिज हॉटेल चालक, आजी-माजी नगरसेवक, उद्योजकांचा फसलेल्यांमध्ये समावेश आहे. 

फसवणुकीबाबत अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही. संबंधितांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- दत्ताराम राठोड, प्रभारी पोलिस अधीक्षक 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of five crore by a trader in Ahmednagar