
संगमनेर येथे महिलेसोबत हा प्रकार घडला आहे.
संगमनेर ः घरातील तांब्या पितळेच्या भांड्यांना दिलेली चकाकी पाहून त्या ज्येष्ठ महिलेचा विश्वास त्याने संपादन केला. भांड्य़ाप्रमाणे दागिने चमकावून देण्याचे आमिष दाखवून, त्याने हातोहात सुमारे 34 हजार 500 रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना, शहरातील मालदाड रोडवरील स्वामी समर्थ नगर येथे मंगळवार ( ता. 16 ) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
याबाबत सुनीता भिकाजी नेहे ( वय 60 ) यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या घरी एकट्या असताना, तांबे पितळेचे भांडे पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने प्रवेश केला.
हेही वाचा - सावधान, लग्नसोहळ्याचे नियम बदललेत
भांडे एकदम चकाचक स्वच्छ केल्यानंतर स्वस्तात सोन्याच्या दागिन्यांनाही पॉलिश करण्याची भुरळ घातली. गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची साखळी, मिनी गंठण असा ऐवज पॉलिशसाठी त्याच्या हवाली केला. त्याने बोलण्यात गुंतवून, नकळत दागिने लंपास केल्याने फसवलो गेल्याचे समजले.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन भामटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.