
अमृतसर (पंजाब) येथील शनि भजनी मंडळाच्या वतीने शनिशिंगणापुर येथे भाविकांसाठी सात दिवस मोफत अन्नदान सुरु करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या विधायक कार्याचे स्वागत केले आहे.
सोनई (अहमदनगर) : अमृतसर (पंजाब) येथील शनि भजनी मंडळाच्या वतीने शनिशिंगणापुर येथे भाविकांसाठी सात दिवस मोफत अन्नदान सुरु करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या विधायक कार्याचे स्वागत केले आहे.
अमृतसर येथील सोनू गुरमीतसींग, गौरव सुदमानी, धर्मेंद्र विजय, राहुल चोपडा, अशू महाजन, शाम चोपडा व शनि भजनी मंडळाने ३१ डिसेंबर २०२० रोजी शनिशिंगणापुर येथे अन्नदान सुरु केले. सकाळी दहा ते रात्री बारावाजेपर्यंत अन्नदान वाटप केले जाते. हा उपक्रम सलग सात दिवस राबविला जाणार आहे.
सकाळी दहा वाजता चहा- नाश्ता दिला जातो. दुपारी बारा ते रात्री बारा यावेळात पोळी,भाजी व वरण-भात दिले जाते. येथे सर्व पंजाबी पध्दतीचे जेवण दिले जाते. तीन दिवसात ऐंशी हजाराहून अधिक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे. हा उपक्रम पाच वर्षापासून केला जात आहे, अशी माहिती गुरमीतसींग यांनी दिली.
अमृतसर येथील शनि भजनी मंडळाचा अन्नदान उपक्रम भाविकांबरोबरच परीसरातील गरजूंना लाभदायक असा आहे.हे सेवाभावी कार्य मनोमन केले जात आहे.
- प्रा. शिवाजी दरंदले, विश्वस्त, शनैश्वर देवस्थान
संपादन : अशोक मुरुमकर