एमएचटी-सीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मौलिक सल्ला

डॉ. एम. पी. नगरकर 
Saturday, 3 October 2020

अभ्यासक्रमातील सूत्रांची वेगळी सूची करून ठेवा व त्याचे वारंवार वाचन करा. प्रत्येक प्रकरणानंतर त्यावर विविध प्रश्न दिलेले असतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या भाषेत लिहून त्यांची उजळणी केल्याने सगळे स्मरणात राहते. 

नगर  - कोविड-19च्या काळात तुम्ही परीक्षा देत आहात. तुमच्या हिमतीला दाद द्यावी वाटते, की तुम्ही या अनिश्‍चिततेच्या काळात अतिशय निर्धारपूर्वक जेईईच्या परीक्षेला सामोरे जात आहात. घाबरून व गोंधळून जाऊ नका. कारण, उद्याचा उज्ज्वल उष:काल तुमची वाट पाहत आहे... 
सध्या तुम्ही एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेच्या तयारीत व्यग्र असतानाच तुम्हाला शिक्षक, आई-वडील, आप्तेष्ट शुभेच्छा देत "अभ्यास कर' असे सांगत असतील. या काळात अभ्यास कसा करावा, याबद्दल थोडक्‍यात... 

"सर्वप्रथम तुम्ही एमएचटी-सीईटी 2020' परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे व परीक्षा पद्धतीचे सखोल अध्ययन करा. शासनाने नेमून दिलेल्या क्रमिक पुस्तकांचे सखोल वाचन करा व महत्त्वाच्या मुद्द्यांचे टिपण करून ठेवा. याचा तुम्हाला परीक्षेच्या आदल्या दिवशी फास्ट रिव्हिजनसाठी उपयोग होईल.

अभ्यासक्रमातील सूत्रांची वेगळी सूची करून ठेवा व त्याचे वारंवार वाचन करा. प्रत्येक प्रकरणानंतर त्यावर विविध प्रश्न दिलेले असतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या भाषेत लिहून त्यांची उजळणी केल्याने सगळे स्मरणात राहते. 

एमएचटी-सीईटी परीक्षा बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाची आहे. यासाठी तुम्ही जे पुस्तके किंवा नोट्‌स वापरता, त्यांचाच वापर करा. ऐन वेळी नोट्‌स व पुस्तकांमध्ये बदल करू नका. संक्षिप्त नोट्‌स, बहुपर्यायी प्रश्न यांची उजळणी करा. तुम्हाला जो विषय, जे प्रकरण किंवा जो टॉपिक कठीण वाटतो, तो भाग तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहून काढा.

तुम्हाला जे विषय सोपे वाटतात, त्यांचीसुद्धा उजळणी करा, जेणे करून तुमचा आत्मविश्वास उंचावेल व तुम्ही कठीण विषय अतिशय आत्मविश्वासाने ग्रहण करू शकाल. आत्मविश्वास उंचावणारे शिक्षक, महाविद्यालयाचे असो किंवा कोचिंग क्‍लासचे; त्यांच्या नियमित संपर्कात राहून त्यांच्या मार्गदर्शनाबरोबरच मनातील शंकांचे निरसन करून घ्या. 

"सीईटी सेल'कडून संकेतस्थळावर एमएचटी-सीईटीची पूर्वतयारी करण्यासाठी सराव प्रश्‍नसंच उपलब्ध करून दिले आहेत. ती सराव परीक्षा तुम्ही कटाक्षाने द्या. प्रत्येक दिवस हा परीक्षेचा दिवस म्हणून मानला, तर परीक्षेचा दिवस नेहमीसारखा वाटेल, जेणे करून तुम्हाला संगणकाधारित परीक्षेच्या वातावरणाची सवय होईल. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fundamental advice for MHT-CET exam takers